---Advertisement---

माजी विक्रमवीराची आजी विक्रमवीरावर कौतुकाची ‘जम्बो’ थाप! ‘तुझं स्वागत आहे या क्लबमध्ये’

On: शनिवार, डिसेंबर 4, 2021 3:08 PM
---Advertisement---

न्यूझीलंडचा ३३ वर्षीय फिरकी गोलंदाज अजाज पटेल सध्या चर्चेत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आला. मयंक अगरवालच्या दीडशतकाच्या जोरावर भारतीय संघाने या धावा केल्या. या दीडशतकवीर मयंकसह भारताच्या सर्व १० फलंदाजांना बाद करत अजाजने इतिहास रचला आणि सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरला. त्याचे कौतुक करणाऱ्यांमध्ये आता माजी भारतीय गोलंदाज अनिल कुंबळे यांचाही समावेश झाला आहे.

अजाजने मुंबई कसोटीच्या पहिल्याच दिवसापासून आक्रमक गोलंदाजी केली. सर्वप्रथम सलामीवीर शुबमन गिल त्याची शिकार ठरला. त्याने ४४ धावांवर त्याला बाद करत त्याचे अर्धशतक हुकवले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली अशा अनुभवी शिलेदारांना त्याने शून्यावर तंबूत धाडले. पुढे श्रेयस अय्यर (१८ धावा) त्याचा पहिल्या दिवसातील शेवटचा विकेट ठरला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा (२७ धावा) आणि अष्टपैलू आर अश्विन (० धावा) यांच्या त्याने एकाच षटकात सलग २ विकेट्स घेतल्या.

भारताच्या आघाडीच्या ६ फलंदाजांना बाद केल्यानंतर त्याचा सर्वात मोठा बळी ठरला, भारताचा दीडशतकवीर मयंक अगरवाल. टॉम ब्लंडलच्या हातून त्याने १५० धावांवर खेळत असलेल्या अजाजला झेलबाद केले. पुढे मैदानावर तळ ठोकलेल्या अष्टपैलू अक्षर पटेललाही त्याने अर्धशतकी खेळी केल्यानंतर आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर रचिन रविंद्रच्या मदतीने खालच्या फळीतील जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांनाही पव्हेलियनला पाठवत त्याने आपल्या १० विकेट्सचा कोटा पूर्ण केला.

अशाप्रकारे कसोटीच्या एका डावात विक्रमी १० फलंदाजांना बाद करत त्याने इतिहासाला गवसणी घातली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या निवडक दिग्गजांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. अजाजपूर्वी भारतीय माजी गोलंदाज अनिल कुंबळे आणि इंग्लंडचे माजी गोलंदाज जिम लेकर यांनी ही प्रशंसनीय कामगिरी केली होती.

या यादीत आता अजाजचाही समावेश झाला असल्याने कुंबळे यांनी मोठ्या मनाने त्याचे स्वागत केले आहे. स्वागत करतेवेळी त्यांनी अजाजवर कौतुकांचा वर्षावही केला आहे. ‘या क्लबमध्ये तुझे स्वागत आहे अजाज, खूप चांगली गोलंदाजी केलीस! कसोटी सामन्याच्या पहिल्या २ दिवशी ही कामगिरी साध्य करण्यासाठी तू केलेल्या विशेष प्रयत्नांचे कौतुक,’ असे कुंबळे यांनी लिहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘इंडियन’ अजाजने कमालच केली; जिथे जन्माला आला, त्याच देशाविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली

…जेव्हा अश्विन कन्फ्यूज होतो; क्लिन बोल्ड झाल्यानंतरही अष्टपैलूने घेतला रिव्ह्यू, मजेशीर प्रसंग तुम्हीही पाहा

…आणि त्यादिवशी सेहवागची इतिहास रचण्याची संधी थोडक्यात हुकली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---