मुंबई । कर्णधार विराट कोहलीशी झालेल्या संघर्षानंतर 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर 49 वर्षीय अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सोडले. माजी कर्णधार अनिल कुंबळे यांना याबद्दल खेद वाटत नाही. परंतु त्यांचा कार्यकाळ अधिक चांगला संपवू शकले असते, असे त्यांचे म्हणणे आहे.
या माजी फिरकी गोलंदाजांने झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू पम्मी मंम्बावावाशी बोलताना सांगितले की, “तो एक वर्षाचा कालावधी खरोखरच चांगला होता. मी काहीतरी योगदान दिले. याचा मला खरोखर आनंद झाला. मला कसालच पश्चात्ताप होत नाही.”
ते म्हणाले, “मला माहित आहे की माझा शेवट यापेक्षाही चांगला असू शकला असता. परंतु तरीही ठीक आहे. एक प्रशिक्षक म्हणून आपल्याला असे वाटते की पुढे जाण्याची वेळ येते तेव्हा कोच यांनाच पुढे जाण्याची आवश्यकता असते. मी खरोखर आनंदी होतो, त्या एका वर्षात मी खूप महत्वाची भूमिका निभावली.”
“भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक झाल्यावर खूप आनंदी होतो. मी भारतीय संघाबरोबर घालवलेले एक वर्ष खरोखर विलक्षण होते. सर्वोत्कृष्ट खेळाडूंसोबत असणे आणि भारतीय ड्रेसिंग रूमचा भाग असणे हे खरोखर खूपच छान वाटायचे,” असे अनिल कुंबळे यांनी सांगितले.
प्रशिक्षक म्हणून कुंबळे हे यशस्वी ठरले होते. त्यावेळी भारतीय संघाने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता आणि कसोटी संघही खूप मजबूत होता, त्याच्या कारकिर्दीत 17 कसोटी सामन्यांपैकी केवळ एक सामना गमावला होता.
कुंबळे यांनी भारताकडून खेळताना 132 कसोटी सामन्यात 619 विकेट्स आणि 271 वनडेत 337 विकेट्स घेतले आहेत. कुंबळे सध्या इंडियन प्रीमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाब फ्रेंचायझीचे मुख्य प्रशिक्षक आहेत.






