पुणे: नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत भारताच्या कारमान कौर थंडी हिने दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे. दुहेरीत भारताच्या अंकिता रैना व कारमान कौर थंडी या जोडीने विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित भारताच्या कारमान कौर थंडीने भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैनाचा 2-6, 6-2, 6-4असा तीन सेटमध्ये पराभव करून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. 2तास 16मिनिटे चाललेल्या या चुरशीच्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये अंकिताने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत वर्चस्व राखले. हा सेट 6-2असा जिंकून सामन्यात आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत कारमानने आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर अंकिताची चौथ्या व आठव्या गेममध्ये सव्हिर्स भेदली व हा सेट 6-2 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सुरुवातीला अंकिताने जोरदार खेळ करत पाचव्या गेममध्ये कारमानची सर्व्हिस रोखली व सामन्यात 3-2अशी आघाडी मिळवली. पण हि आघाडी अंकिताला फार काळ टिकवता आली नाही.
आठव्या गेममध्ये कारमानने अंकिताची सर्व्हिस ब्रेक करून सामन्यात 4-4अशी बरोबरी साधली. त्यानंतर कारमानने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत दहाव्या गेममध्ये अंकिताची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4असा जिंकून विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत स्लोव्हेनियाच्या अव्वल मानांकित तामरा झिदनसेकने स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारेजचा 4-6, 6-1, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 1तास 56मिनिटे चालला.
दुहेरीत अंतिम फेरीत भारताच्या अंकिता रैनाने कारमान कौर थंडीच्या साथीत बल्जेरियाच्या अलेक्झांड्रा नेदिनोवा व स्लोव्हेनियाच्या तामरा झिदनसेक यांचा 6-2, (5)6-7, 11-9 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. हा सामना 1 तास 36मिनिटे चालला.
स्पर्धेतील विजेत्या जोडीला करंडक व 50डब्लुटीए गुण, उपविजेत्या जोडीला करंडक व 30 डब्लुटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण क्रीडा व युवा सेवासंचलनालय, महाराष्ट्रचे सहआयुक्त नरेंद्र सोपल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे आणि आ पुणे ओपनचे सहसचिव सुधीर धावडे आणि शिवाजी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी):
कारमान कौर थंडी(भारत)[4] वि.वि.अंकिता रैना(भारत)(2)2-6, 6-2, 6-4;
तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया)(1)वि.वि.
इवा गुरेरो अल्वारेज(स्पेन)4-6, 6-1, 6-3;
दुहेरी गट: अंतिम फेरी:
अंकिता रैना(भारत)/कारमान कौर थंडी(भारत)वि.वि.अलेक्झांड्रा नेदिनोवा(बल्जेरिया)/ तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया) 6-2, (5)6-7, 11-9.