मध्य रेल्वे, युनियन बँक यांनी अंकुर स्पोर्ट्स क्लब आणि डॉ.शिरोडकर विचार अमृतधारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पुरुष विशेष व्यावसायिक गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. कुमार गटात बंड्या मारुती, वारसलेन यांची आगेकूच केली.
लालबाग, गणेश गल्ली येथील स्व.अनिल कुपेरकर क्रीडांगणावर सुरू झालेल्या व्यावसायिक क गटात मध्य रेल्वेने मुं. पोलीस संघाचे कडवे आव्हान ३३-३०असे मोडून काढले. प्रो-कबड्डी स्टार श्रीकांत जाधव, मयुर शिवतरकर यांच्या झंजावाती चढाया आणि सुरज बनसोडे याच्या भक्कम बचावाच्या जोरावर रेल्वेने विश्रांतीपर्यंत १९-१६ अशी आघाडी घेतली.
उत्तरार्धात पोलिसांच्या अनिकेत पाटील,जितेंद्र पाटील, चेतन गायकवाड यांनी तोडीस तोड लढत दिली. परंतु मध्यांतरातील आघाडी काय त्यांना मोडून काढता नाही आली. त्यामुळे त्याच ३गुणांच्या फरकाने बँकेचा पराभव झाला.
व्यावसायिक दुसऱ्या सामन्यातील ब गटात युनियन बँकेने माझगाव डॉकचा प्रतिकार ४२-२२ असा सहज संपविला. युनियन बँकेच्या नितीन घोगळे यांने आपल्या एका चढाईत ५गडी टिपत या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
त्याला अजिंक्य कापरेने चढाईत, तर अजिंक्य पवारने पकडीत मोलाची साथ दिली. पहिल्या डावात २६-१४अशी आघाडी घेणाऱ्या बँकेने दुसऱ्या डावात देखील तोच जोश कायम ठेवत मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला.
कुमार गटात बंड्या मारुतीने लक्ष्मीमातांचे आव्हान ४१-२५असे संपुष्टात आणले. मध्यांतराला २४-१२अशी भक्कम आघाडी विजयी संघाकडे होती. कार्तिक व गणेश हे पाटील बंधू बंड्या मारुतीकडून, तर तुषार मोरे, अमन मण्यार हे लक्ष्मीमाता कडून छान खेळले.
दुसऱ्या सामन्यात वारसलेनने सोहम नार्वेकर, प्रांजल पाटील यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर बारादेवीचा ३६-३३असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. पहिल्या डावात २१-१३अशी आघाडी घेणाऱ्या वारसलेनला दुसऱ्या डावात मात्र बारादेवीच्या आदेश कवडे, सुजित रांबळे यांनी चांगलेच झुंजवले.
पण संघाला विजयी करण्यास मात्र ते कमी पडले. कुमार गटाचे इतर निकाल संक्षिप्त १)वंदे मातरम वि वि वीर बजरंग ७०-३८, २)विजय बजरंग व्या.शाळा वि वि गोलफादेवी ६९-६६, ३)आंबेडकर स्पोर्ट्स वि वि न्यु परशुराम ४७-४४, ४)जय भारत वि वि महाराष्ट्र स्पोर्ट्स ३९-३१.
या स्पर्धेचे उदघाटन खासदार व मुं.उपनगर जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष गजानन किर्तीकर, खासदार अनिल देसाई, विभागीय आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू सपकाळ, युनियन बँकेचे जनरल मॅनजर डॉ.के. एल. राजू आणि एस. सी. मित्तल, बँकेचे क्रीडाधिकारी रमेश मतकरी आणि अंकुर स्पोर्ट्स क्लबचे विश्वस्त अनिल घाटे यांच्या उपस्थित पार पडला.