सध्या भारतामध्ये देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. विविध वयोगट स्पर्धांसह वरिष्ठ गटातील स्पर्धा देखील वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवल्या जात आहेत. त्याचवेळी हिमाचल प्रदेश येथून एका युवा खेळाडूला संघात निवडीसाठी लाच मागितल्याचे प्रकरण समोर आले असून, यामध्ये मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूचा देखील समावेश आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशचा युवा खेळाडू अंशुल राज याने गुरुग्राम येथील कॉर्पोरेट मॅनेजमेंटचे अध्यक्ष आशुतोष बोरा यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. आगामी सीके नायडू ट्रॉफीसाठी हिमाचल प्रदेश या संघात निवड करण्यासाठी त्यांनी आपल्याला १० लाखाची मागणी केल्याची व त्यानंतर फसवणूक केल्याचा आरोप केला अंशुल याने केला आहे. आशुतोष व त्यांची बहिण चित्रा यांनी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये अशा प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे समोर आल्यानंतर हरियाणा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्यावर दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये फसवणूक, कट रचणे व धमकी देणे या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
अंशुलने दिली प्रतिक्रिया
हे प्रकरण उघडकीस आणणार्या अंशुल राज याने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले,
“सामान्य घरातून येणाऱ्या माझ्यासारख्या खेळाडूला त्यांनी फसवत अनेक आमिषे दाखवून लुटले आहे. माझे व माझ्या घरच्यांचे मला भारतासाठी खेळताना पाहण्याचे स्वप्न आहे. याचमुळे आम्ही फसलो गेलो. माझी पोलिसांना नम्र विनंती आहे की त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हावी.”
मुंबई इंडियन्सचा तो खेळाडू सहभागी
अंशुल राज याने या प्रकरणात जावेद खान या वरिष्ठ खेळाडूचे नाव घेतले आहे. तो आशुतोष बोरा याच्यासाठी सिक्युअर कॉर्पोरेट मॅनेजर म्हणून काम पाहत होता. वेगवान गोलंदाज असलेला जावेद दिल्लीमध्ये अनेक टी२० लीगमध्ये सहभागी झालेला. तर सुरुवातीच्या आयपीएल हंगामात तो मुंबई इंडियन्स संघासोबत नेट बॉलर म्हणून जोडला गेला होता.