क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. येथे एक चेंडू, एक धाव किंवा एक झेलही संपूर्ण सामना पालटू शकतो. रविवारी (२७ मार्च) पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात आयपीएल २०२२ चा तिसरा सामना झाला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना २०५ धावा केल्या होत्या. तरीही त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. पंजाबकडून ओडेन स्मिथ याने धुव्वादार खेळी करत बेंगलोरच्या तोंडून विजयाचा घास हिसकावून घेतला.
याबरोबरच अजून एक गोष्ट बेंगलोरच्या पराभवाची प्रमुख कारण ठरली. ती म्हणजे, बेंगलोरच्या अनुज रावत (Anuj Rawat) याने स्मिथचा सोडलेला महत्त्वपूर्ण झेल (Anuj Rawat Dropped Odean Smith Catch). त्या एका झेलने अनुजला रातोरात बेंगलोरच्या नायकापासून खलनायक बनवले.
त्याचे झाले असे की, १७व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अनुजने स्मिथचा (Odean Smith) डीप एक्स्ट्रा कव्हरवर एक सोपा झेल सोडला. या जीवनदानाचा फायदा घेत स्मिथने मैदानाच्या चारही बाजूंना जोरदार फटकेबाजी केली. त्याने १८व्या षटकात बेंगलोरचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला ३ षटकार आणि १ चौकार ठोकत ताबडतोब २५ धावा चोपल्या. विशेष म्हणजे, त्याने या धावा केवळ ८ चेंडूंमध्ये केल्या आहेत. स्मिथच्या या जबरदस्त फलंदाजीमुळे पंजाबने ६ चेंडू शिल्लक असतानाच सामना खिशात घातला.
— Sam (@sam1998011) March 27, 2022
देवदत्त पड्डीकलच्या अनुपस्थितीत अनुजकडे सलामीची जबाबदारी
मेगा लिलावात धाकड सलामीवीर देवदत्त पड्डीकलला विकत घेण्यात अपयशी ठरल्यानंतर बेंगलोरने युवा अनुज रावतला ३ कोटी ४० लाखांना विकत घेतले होते. तसेच हंगामातील पहिल्याच सामन्यात त्याला सलामीलाही संधी दिली. अनुजने पंजाबविरुद्धच्या या सामन्यात १०५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना २० चेंडूंमध्ये १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २१ धावा काढल्या. पुढे राहुल चाहरच्या गोलंदाजीवर तो त्रिपळाचीत झाला.
राजस्थान रॉयल्सचा भाग होता अनुज
यापूर्वी अनुज संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्याने आयपीएल २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आयपीएल पदार्पण केले होते. मात्र त्याला या हंगामात जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. तो पूर्ण हंगामात फक्त २ सामने खेळू शकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
….म्हणून कुलदीप केकेआरपेक्षा दिल्लीसाठी करणार चांगले प्रदर्शन, अक्षर पटेलने सांगितले कारण
पंजाबविरुद्ध २०५ धावा करूनही का झाला पराभव, आरसीबीचा कर्णधार डू प्लेसिसचे स्पष्टीकरण
टी२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा नवा कारनामा, ‘या’ विक्रमात डेविड वॉर्नरला सोडले मागे