भारताचा महान कबड्डीपटू आणि कर्णधार अनुप कुमारला एशियन चॅम्पियनशिपच्या संभाव्य ३५ खेळाडूंच्या संघातून वगळण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ नोव्हेंबरपासून इराण येथे होणार आहे.
२०१६च्या संघाचे नेतृत्व करत भारताला कबड्डीचा विश्वचषक जिंकून देणाऱ्या या खेळाडूला हरियाणा येथे होत असलेल्या ‘सिलेक्शन कॅम्प’ला बोलावण्यात आले नाही.
निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या ३५ खेळाडूंपैकी तमील थलाइवाजचा कर्णधार अजय ठाकूर हा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. ३५ खेळाडूंमध्ये मंजीत चिल्लर आणि जसवीर सिंग यांना संधी देण्यात आली आहे किंवा नाही याबद्दल कोणतेही वृत्त नाही.
सूत्रांनुसार निवड समितीला या स्पर्धेत युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे. त्याचमुळे प्रदीप नरवाल, रिशांक देवाडिगा, के प्रपंजन आणि सचिन तवरसारख्या खेळाडूंना ३५ जणांच्या कॅम्पमध्ये स्थान देण्यात आले आहे.
भारताची धुरा गेली अनेक वर्ष एकहाती सांभाळणाऱ्या ३४ वर्षीय अनुप कुमारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रो कबड्डीच्या ५व्या मोसमातही या खेळाडूला लौकिकाला साजेशा खेळ करण्यात अपयश आले होते.
संभाव्य ३५ खेळाडूंपैकी १२ खेळाडू स्पर्धेसाठी इराणला जाणार आहेत. संघातील सर्वात अनुभवी आणि वयस्कर खेळाडू अजय ठाकूरकडे संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते. कारण या खेळाडूने २०१६ विश्वचषकातही चांगली कामगिरी केली होती. परंतु त्याला कर्णधारपदाची जबाबदारी दिल्याचे कोणतेही अधिकृत वृत्त नाही.