प्रो कबड्डीमध्ये यु मुंबाचा स्टार रेडर श्रीकांत जाधव सध्या खूप चांगल्या लयीत आहे. मागील काही सामन्यातील त्याच्या खेळाच्या जोरावर यु मुंबा संघाने सामने जिंकले आहेत. शब्बीर बापू दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला यु मुंबाचा नियमित खेळाडू म्हणून खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले. उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याने संघातील आपले स्थान निश्चित तर केलेच त्याचबरोबर यु मुंबासंघाच्या अनेक पाठिराख्यांच्या गळ्यातील तो ताईतही बनला आहे.
अल्पावधीत यु मुंबाचा हा लाडका खेळाडू लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला आहे. त्याच्या कबड्डीच्या प्रवासाचा उलघडा व्हावा आणि त्याच्याबद्दल आणखी माहिती मिळावी म्हणून त्याची महास्पोर्ट्सने खास मुलाखत घेतली.
या मुलाखतीत त्याला तू कसा कबड्डीकडे वळाला याविषयी विचारले असता त्याने सांगितलं,” खरे सांगायचे झाले तर मी अगोदर अॅथलेटिक्स खेळणार होते. माझी शरीरयष्टी अॅथलेटिक्ससाठी उत्तम असल्याने शाळेतील सरांनी आणि घरच्यांनी मी अॅथलेटिक्स खेळावे असे सांगितले. परंतु अॅथलेटिक्समध्ये माझी प्रगती होत नव्हती. माझ्या घराच्या पाठीमागे कबड्डीचे मैदान होते. ते मला जास्त खुणावत होते. काही दिवसानंतर मी कबड्डीकडे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले.”
प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात जयपुर पिंक पँथर संघासाठी निवड ते यु मुंबा संघाचा मुख्य खेळाडू हा प्रवास कसा होता त्याबद्दल बोलताना तो म्हणाला ,” प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात मला जयपुर पिंक पँथर्सने करारबद्ध केले. परंतु मोसमाच्या सुरुवातीलाच दुखापतग्रस्त झालो. मला शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे मला खेळता आले नाही. दुसऱ्या मोसमात देखील त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाले. त्यामुळे मला पहिले दोन मोसमात खेळता आले नाही. त्यामुळे स्वतःला कमनशिबी समजतो.
तिसऱ्या मोसमात नितीन मदनेने माझे नाव बेंगाल वॉरियर्सला सुचवले. त्यानंतर मी बेंगाल वॉरियर्स संघासाठी करारबद्ध झालो. त्यांनी मला संघात घेतले पण मला तिथे नियमित खेळाडू म्हणून फारशी संधी मिळाली नाही. त्यानंतर या मोसमात मला यु मुंबा संघाने करारबद्ध केले. ”
यु मुंबा विषयीची आत्मीयता दाखवताना तो बोलतो,” यु मुंबा प्रो कबड्डीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला संघ आहे. यु मुंबा संघाचा वारसा खूप मोठा आहे. मी स्वतः महाराष्ट्राचा खेळाडू आहे परंतु मला कधी महाराष्ट्राच्या संघाकडून खेळायला मिळाले नाही. मी विदर्भासाठी खेळायचो. माझे स्वप्न होते की मी यु मुंबा संघासाठी खेळावे. त्यामध्ये माझा स्वार्थ देखील होता की यु मुंबाकडून खेळलो तर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व्य केल्याची भावना येईल.”
यु मुंबाचा कर्णधार अनुप कुमार विषयी बोलताना तो म्हणतो,” अनुप कुमार या घडीचा सर्वात महान खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वगुणावर सारे जग फिदा आहे. त्याच्या विषयी जितके बोलावे तेवढे कमी आहे. तो मला नेहमी नैसर्गिक खेळ करण्यास प्रवृत्त करतो. यु मुंबाचे पूर्ण स्टाफ खूप मनमिळावू आहे.
नितीन मदने आणि त्याच्या मैत्री विषयी बोलताना तो म्हणाला,” नितीन आणि मी लहानपणीचे मित्र आहोत. तो मला नेहमी लहान भावासारखा वागवतो. तो माझ्यासाठी नेहमी पाठीराख्यासारखा उभा असतो. अनेक कॅम्पसाठी निवड झाल्यानंतर आम्ही अनेकदा रूममेट्स असायचो. २०१४ साली राष्टीय कॅम्पसाठी निवड झाल्यावर देखील आम्ही एकाच रूमध्ये होतो.”
तुला कोणत्या संघाविरुद्ध खेळायला आवडते असे विचारले असता तो म्हणाला,” या मोसमात आमचा पटणा पायरेट्स विरुद्ध इंटर झोनल सामना झाला. पटणाचा संघ झोन बी मधील सर्वात मजबूत संघ आहे. त्यांना हरवायचे असे मला खूप वाटायचे. हा सामना आम्ही जिंकला. त्यामुळे खूप आनंद झाला. या सामन्यात आम्ही रेडींगमध्ये खूप चांगली कामगिरी केली याचा मला अभिमान आहे. पुणेरी पलटण विरुद्ध खेळायला जास्त आवडते. विरोधी संघ जितका मजबूत तितके मला उत्तम कामगिरी करण्याचे स्फुरण येते. माझी कामगिरी देखील मजबूत संघाविरुद्ध खूप चांगली होते.”
या मोसमात आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करणाऱ्या या यु मुंबाच्या खेळाडूकडून पुढील सामन्यात देखील उत्तम कामगिरीची आपण अशा करू. श्रीकांत यु मुंबा आणि भारतीय कबड्डी विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करेल अशी अशा करू.