भारतातील अनेक खेळाडूंच्या जीवनावर आत्तापर्यंत चरित्रपट बनले आहेत. अशा चित्रपटांना मोठे यशही मिळाले आहे. असे असतानाच काही महिन्यांपूर्वी भारतीय महिला संघातील स्टार वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी याच्या जीवनावरही एक चित्रपट बनवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीच्या भूमीकेत दिसत आहे.
‘चकदा एक्सप्रेस’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. खरंतर झुलन गोस्वामीला ‘चकदा एक्सप्रेस’ म्हणून ओळखले जाते, त्याचमुळे चित्रपटाचे नावही तेच ठेवण्यात आले आहे. हा चित्रपट अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ कर्णेश शर्मा यांच्या क्लीन स्लेट फिल्मची निर्मिती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केले आहे. असे असले तरी, अद्याप चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचा टिझर अनुष्का शर्माने सोशल मीडियावर शेअर केला असून तिने झुलन गोस्वामीसाठी मोठा संदेशही लिहिला आहे. तिने लिहिले की, ‘हा चित्रपट खरंच खूप खास आहे. कारण, ही जबरदस्त त्यागाची कहाणी आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ हा भारताची माजी कर्णधार झुलन गोस्वामीच्या जीवनावर प्रेरित चित्रपट आहे. हा चित्रपट महिला क्रिकेट विश्वाचे डोळे उघडणार आहे. जेव्हा झुलन गोस्वामीने क्रिकेटपटू बनून आपल्या देशाचा गौरव जागतिक स्तरावर उंचावण्याचा निर्णय घेतला, तेव्हा महिलांसाठी खेळात कारकिर्द घडवण्याचा निर्णय घेणेही कठीण होते. हा चित्रपट तिच्या आयुष्याला आणि महिला क्रिकेटला आकार देणार्या अनेक घटनांचे नाट्यमय वर्णन आहे.’
अनुष्काने पुढे लिहिले की, ‘सपोर्ट सिस्टमपासून सुविधांपर्यंत, खेळातून स्थिर उत्पन्न, क्रिकेटमध्ये भविष्य घडवण्यापर्यंत आणि भारतातील महिलांना क्रिकेट हे क्षेत्र निवडण्यापर्यंत खूप प्रेरणा मिळाली आहे. झुलनची क्रिकेट कारकिर्द एक संघर्षपूर्ण आणि अनिश्चित राहिले आहे. तिने देशाला गौरव मिळवून दिला आहे. भारतात क्रिकेट खेळून महिला कारकिर्द घडवू शकत नाहीत, हा समज बदलण्याचा तिने प्रयत्न केला, जेणेकरून पुढच्या पिढीतील मुलींना खेळासाठी चांगले मैदान मिळेल. अजूनही खूप काम करणे बाकी आहे. भारतात महिलांसाठी खेळाचे क्षेत्र भरभराटीला यावेत यासाठी आपण त्यांना सशक्त केले पाहिजे.’
याशिवाय अनुष्काने असेही म्हटले आहे की, ‘आपण सर्वांनी झुलन आणि तिच्या संघसहकाऱ्यांना सलाम केला पाहिजे, कारण त्यांनी भारतातील महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवली.’
https://www.instagram.com/p/CYX7vaDFcDZ/
झुलन गोस्वामीची कारकिर्द
झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी महिला गोलंदाज आहे. तसेच तिला पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. झुलन गोस्वामीने तिच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत १२ कसोटी, १९२ वनडे आणि ६८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहे. तिने कसोटीत ४४ विकेट्स, वनडेत २४० विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५६ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंतशी पंगा, मग होणार दंगा! एडेन मार्करमच्या स्लेजिंगला रिषभचे सडेतोड उत्तर, पाहा व्हिडिओ
लेकीच्या वाढदिवशी सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी विराटची जोरदार तयारी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
Video: बाद झाल्यानंतर रिषभ पंतचे हरपले भान! पॅव्हेलियनमध्ये परतताना केले असे काही