मुंबई । माजी कर्णधार एमएस धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011 साली वनडे विश्वचषक जिंकला. भारतीय संघाने तब्बल 28 वर्षांनंतर विश्वचषकावर मोहोर लावली. विश्वचषक जिंकण्याचा असा कारनामा भारताने दुसऱ्यांदा केला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण मानला जातो.
दरम्यान, श्रीलंकेचे तत्कालीन क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगामगे यांनी 2011 साली झालेला विश्वचषकातील अंतिम सामना हा फिक्स असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांनंतर क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली होती. महिंदानंदा अलुथगामगे यांच्या मते, श्रीलंकेने हा सामना जाणून बुजून हरला. जणू हा सामना भारताला बहाल केला होता.
महिंदानंदा अलुथगामगे यांच्या या आरोपानंतर श्रीलंकेच्या विद्यमान क्रीडा मंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आयसीसीने देखील या प्रकरणाला गंभीर घेतले आहे. लवकरच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. आयसीसी या प्रकरण संबंधी महिंदानंदा अलुथगामगे यांचीही चौकशी करू शकते.
2011 साली झालेल्या विश्वचषकाच्या वेळी अलथागमगे श्रीलंकेचे क्रीडामंत्री होते. विश्वचषकाच्या अंतिम आणि महत्त्वपूर्ण सामन्यात श्रीलंका संघाने आपल्या संघात चार बदल केले होते. या संघनिवडीवरच क्रीडामंत्र्यांनी आक्षेप घेतले आहे. संघात हे चार बदल करण्यापूर्वी कुणालाही विचारण्यात आली नसल्याचे क्रीडा मंत्र्यांचे म्हणणे आहे.