इंग्लंड आणि भारत यांच्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांदरम्यान मैदानावर खेळाडूंमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली होती. स्लेजिंगचा खेळ शिगेला पोहोचला होता आणि दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी भिडताना दिसले. अनेक प्रसंगी पंचांना हस्तक्षेप करावा लागला. अनेक तज्ञांचा असा विश्वास होता की, भारतीय संघाच्या या चांगल्या कामगिरीमागे इंग्लंडकडून केले गेलेले स्लेजिंग देखील कारण आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने हे दावे फेटाळले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, “आम्ही असा (इंग्लंडच्या स्लेजिंगचा) काहीही विचार करत नाही. आमच्यासाठी, चांगले क्रिकेट खेळणे, सध्याच्या क्षणी जगणे आणि एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. शेवटच्या सामन्यात काय झाले ते विसरून सकारात्मकतेने पुढे जायचे आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे.”
अजिंक्य रहाणे लॉर्ड्स कसोटीत छाप पाडण्यात यशस्वी झाला होता. ३३ वर्षीय रहाणेने लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ६१ धावांची खेळी केली होती. आता तो त्याची ही उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
भारताने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाचा १५१ धावांनी पराभव केला. पहिल्या डावात १२९ धावा केल्याबद्दल केएल राहुलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तसेच पहिला कसोटी सामना पाचव्या दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने अनिर्णित राहिला होता.
आता तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर खेळला जाईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरुवात होईल. हा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल, तर इंग्लंड संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या हेतूने या सामन्यात उतरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटवर कोरोनाची पुन्हा वक्रदृष्टी! न्यूझीलंडच्या धडाकेबाज सलामीवीराचा अहवाल आला पॉझिटिव