रणजी ट्रॉफी 2024 ची पाचवी फेरी आजपासून (13 नोव्हेंबर) सुरू झाली. सध्या गोव्याचा सामना अरुणाचल प्रदेशशी होत असून या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची कामगिरी चर्चेचा विषय ठरली आहे.
अर्जुननं अरुणाचल प्रदेशविरुद्ध कारकिर्दीत पहिल्यांदाच पाच विकेट घेत विरोधी संघाला 100 धावाही करू दिल्या नाहीत. अरुणाचल प्रदेशकडून केवळ 4 फलंदाज दुहेरी धावांचा आकडा धावा गाठू शकले. त्यापैकी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजानं 25 धावा केल्या. अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ 30.3 षटकात केवळ 84 धावा करून गडगडला.
या सामन्यात अरुणाचल प्रदेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय अर्जुन तेंडुलकरनं आपल्या घातक गोलंदाजीनं पूर्णपणे चुकीचा सिद्ध केला. त्यानं नबाम हाचांग (0), नीलम ओबी (26), जय भावसार (0), चिन्मय पाटील (3) आणि मोजी आटे (1) यांना बाद केलं. अर्जुननं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत प्रथमच एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
अर्जुनच्या कामगिरीची विशेष बाब म्हणजे, त्याच्या पाचही विकेट आघाडीच्या फलंदाजांच्या होत्या. म्हणजेच त्यानं नव्या चेंडूनं विरोधी फलंदाजांची अक्षरश: नासधुस केली. अरुणाचल प्रदेशच्या डावात अर्जुननं 9 षटकं टाकली. यादरम्यान त्यानं 3 षटकं मेडन टाकली आणि 25 धावा देत 5 यश मिळवले. याआधी आपल्या कारकिर्दीत अर्जुननं कधीही एका डावात पाच बळी घेतले नव्हते. त्याची सर्वोत्तम कामगिरी 4/49 होती.
मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2025 साठी अर्जुन तेंडुलकरला रिटेन केलेलं नाही. त्यामुळे तो आता मेगा ऑक्शनमध्ये दिसणार आहे. अर्जुन गोलंदाज करण्याबरोबरच खालच्या फळीत फलंदाजी देखील करू शकतो. अशा परिस्थितीत तो निश्चितच काही संघांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो.
हेही वाचा –
अर्शदीप सिंग इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, या बाबतीत होणार भारताचा ‘नंबर-1’ वेगवान गोलंदाज
एमएस धोनी अडचणीत! चढाव्या लागू शकतात कोर्टाच्या पायऱ्या; प्रकरण जाणून घ्या
विराट किंवा गांगुली नाही, हा खेळाडू आहे भारताचा ऑस्ट्रेलियातील सर्वात यशस्वी कर्णधार, पाहा आकडेवारी