१९ वर्षांखालील कूच बिहार ट्रॉफीत अर्जुन तेंडुलकरने मुंबई संघाकडून खेळताना रेल्वेविरुद्ध दुसऱ्या डावात आज ५ बळी घेऊन मुंबईच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली आहे. या सामन्यात मुंबईने १ डाव आणि १०३ धावांनी विजय मिळवला.
सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईने पहिल्या डावात यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर ३८९ धावांचा डोंगर उभा केला होता. या डावात सीडॅक सिंगनेही अर्धशतकी खेळी केली होती. तर अर्जुनने २१ धावा केल्या होत्या.
रेल्वेच्या फलंदाजांची याचे उत्तर देताना चांगलीच दमछाक झाली. त्यांच्या फलंदाजीला मुंबईचा गोलंदाज अभिमन्यू वैशिष्ठ्यने ३० धावात ८ बळी घेत चांगलाच धक्का दिला. अभिमन्यूच्या या कामगिरीमुळे रेल्वेचा पहिला डाव १५० धावतच आटोपला. त्यामुळे मुंबईने रेल्वेला फॉलोऑन दिला.
दुसऱ्या डावातही रेल्वेच्या फलंदाजांची पहिल्या डावासारखीच अवस्था झाली. त्यांच्या दुसऱ्या डावात अर्जुनने ४४ धावात ५ बळी घेतले. तसेच सीडॅकने ३ बळी घेतले त्यामुळे रेल्वे दुसऱ्या डावात फक्त १३६ धावाच करू शकली. या सामन्यात अभिमन्यूने सर्वाधिक ९ बळी घेतले आहेत.
अर्जुनने याआधीही या वर्षी याच स्पर्धेत मध्यप्रदेश विरुद्ध ५ बळी घेतले होते पण तो सामना अनिर्णित राहिला होता. तसेच आसाम विरुद्ध त्याने ४ बळी घेऊन मुंबईच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी केली होती.