ऍशेस 2023 चा पहिला सामना बर्मिंघमच्या एजबस्टन मैदानावर पार पडला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी (मंगळवार 20 जून) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पराभव केला. उभय संघांतील हा सामना चाहत्यांसाठी एक मेजवानी ठरली. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही संघ विजयाच्या प्रयत्नात होते. मात्र, अखेरीस ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. पॅट कमिन्स याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आणि दोन विकेट्स राखून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्याचा सामनावीर ठरलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीर उस्मान ख्वाजा याने यादरम्यान सलग पाच दिवस फलंदाजी करण्याचा निराळा विक्रम देखील केला.
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सलग पाच दिवस फलंदाजी करण्याची कामगिरी मोजक्याच फलंदाजांना जमली आहे. ख्वाजा याने या सामन्यात अशी कामगिरी करून दाखवली. पहिल्या दिवशी तो 4 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी 122 धावा करत नाबाद राहिलेला. तर, तिसऱ्या दिवशी यामध्ये आणखी 15 धावांची भर त्याने घातली. त्यानंतर चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात देखील त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. चौथ्या दिवसाच्या अखेरीस 34 व पाचव्या दिवशी आणखी 31 धावा त्याने जोडल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी आतापर्यंत 13 फलंदाजांनाच जमली आहे. विशेष म्हणजे भारताचे एमएल जयसिम्हा अशी कामगिरी करणारे पहिले फलंदाज होते. 1970 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी हा कारनामा केलेला. भारताकडून रवी शास्त्री व चेतेश्वर पुजारा यांनी देखील पाच दिवस फलंदाजी केली आहे. शास्त्री यांनी 1984 मध्ये इंग्लंड विरुद्ध तर पुजाराने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पाच दिवस फलंदाजी केलेली.
या सामन्याचा विचार केल्यास इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर पहिल्या दिवशी 393 धावांवर आपला डाव घोषित केलेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तर देत ख्वाजाच्या शतकासह 386 पर्यंत मजल मारली. इंग्लंडला आपल्या दुसऱ्या डावात 273 धावा करता आल्या. विजयासाठी मिळालेले 281 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून पूर्ण केले.
(Ashes 2023 Usman Khawaja Batting All Five Day In Edgebaston Test)
महत्वाच्या बातम्या –
महाराष्ट्र आयर्नमॅनचा आणखी एक थरारक विजय, गोल्डन ईगल्स यूपी संघावर १ गुणाने बाजी
ऑस्ट्रेलियाने फोडला इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’चा फुगा! ऍजबस्टन कसोटीत मिळवला थरारक विजय