---Advertisement---

एका कैद्यासाठी रद्द झालेली मोठी टेस्ट मॅच, ज्याला म्हटलं जातं इंग्लंडच्या इतिहासातील कुप्रसिद्ध दरोडखोर

On: मंगळवार, मार्च 7, 2023 1:21 PM
George-Davis
---Advertisement---

भारत-पाकिस्तानच्या मॅचेसमध्ये निषेध म्हणून शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमची व फिरोज शाह कोटला स्टेडियमचे पिच उखडल्याच्या घटना सर्वांना ज्ञात आहेत. दोन्ही देशातील संबंध तणावाचे झाले असताना, भारत-पाकिस्तान मॅचेस होऊ नये म्हणून शिवसैनिकांनी या दोन्ही स्टेडियमच्या पिच उखडून टाकलेल्या. मात्र, यापूर्वीच पिच खराब करण्याची एक घटना इंग्लंडच्या हेडिंग्लेवर झाली होती आणि ती देखील प्रतिष्ठेच्या ऍशेज सीरिज दरम्यान.

सन 1975 ची ऍशेस इंग्लंडमध्ये होत होती. बर्मिंघम येथे झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये इंग्लंडला चारीमुंड्या चीत करत ऑस्ट्रेलियाने सिरीजमध्ये आघाडी घेतली. लॉर्ड्सवरील दुसर्‍या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने 484 रनांचा पाठलाग करताना 329-3 रन करून मॅच ड्रॉ केली. तिसरी मॅच हेडिंग्लेच्या लीड्स ग्राऊंडवर होती. इंग्लंडने टॉस जिंकत बॅटिंग करताना समाधानकारक सुरुवात केली.

डेव्हिड स्टील, जॉन एड्रिच आणि कॅप्टन टोनी ग्रेग यांनी फिफ्टी मारून इंग्लंडला पहिल्या दिवशी 5 विकेट्स 251 पर्यंत मजल मारून दिली. पण, दुसऱ्या दिवशी गॅरी गिल्मोर यांच्या 6 विकेट्समुळे इंग्लंडचा डाव 288 रन्सवर आटोपला. ऑस्ट्रेलिया बॅटिंगला उतरल्यानंतर, इंग्लंडच्या फिल एडमंड्स यांच्या बॉलिंगसमोर त्यांची वाताहत झाली. एडमंड्स यांच्या पाच विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 134 रन्सवर संपुष्टात आला. इंग्लंडने दुसऱ्या डावात, डेव्हिड स्टील यांच्या 92 व टोनी ग्रेग यांच्या 49 रनांच्या जोरावर 291 रन्स स्कोर बोर्डवर लावल्या.

इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर 445 रनांचे मोठे लक्ष्य ठेवल्यामुळे यजमानांना सीरिज बरोबरीत आणण्याची संधी होती. पण, ऑस्ट्रेलिया सहजासहजी हार मानणार संघ नव्हता. चौथ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 विकेट्स 220 अशी दिसत होती. ओपनर रिक मॅककोस्करने नॉट आउट 95 तर कॅप्टन इयान चॅपल 62 रन्सवर नॉट आऊट खेळत होते. अखेरच्या दिवशी, सीरिज बरोबरीत आणण्यासाठी यजमानांना सात विकेट्स, तर ऍशेस आपल्याकडे राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 225 रन्सची गरज होती.

पाचव्या अखेरच्या आणि निर्णायक दिवशी सकाळी, ग्राऊंड्समन जॉर्ज कॅथ्रे यांनी पिचवरील कव्हर्स काढले तर ते चकीत झाले. कारण, संपूर्ण पिचवर ठिकठिकाणी लहान लहान खड्डे करून त्यात तेल भरण्यात आलेले. कॅथ्रे यांनी पिच दुरुस्त करण्याचे अनेक पर्याय तपासून पाहिले मात्र त्यांना अपयश आले. दोन्ही संघांच्या कर्णधारांना तातडीने खेळपट्टी बघण्यासाठी बोलविले गेले. टोनी ग्रेग व इयान चॅपल यांनी पिच पाहून मॅच न खेळण्याचे ठरवले. शेजारच्या पिचवर मॅच पूर्ण करण्याची कल्पनाही दोघांनी धुडकावून लावली. मॅच ड्रॉ झाली. दुर्दैवाने, रिक मॅककोस्कर यांना पहिले शतक पूर्ण करण्यासाठी पुढील मॅचची वाट पाहावी लागली.

रात्रीच्यावेळी पहारेदारी करणाऱ्या सिक्युरिटी गार्डकडे चौकशी केली असता त्याने, आपण कोणताही आवाज ऐकला नसल्याचे सांगितले. शेवटी, आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेतली गेली. त्या रात्रीच हेडिंग्ले शहरातील अनेक भिंतीवर “जॉर्ज डेव्हिस इज इनोसेंट, फ्री जॉर्ज डेव्हिस, जस्टीस फॉर जॉर्ज” अशा प्रकारच्या घोषणा लिहिल्या गेल्या होत्या. पोलिसांनी लवकरच तपास लावला की, जॉर्ज डेव्हिसच्या समर्थकांनीच खराब केलेली. या प्रकरणात तीन व्यक्तींना अटक केली गेली.

मात्र, ज्या जॉर्ज डेव्हिससाठी चक्क ऍशेसला बालंट लावलं गेलं, तो जॉर्ज डेव्हिस होता तरी कोण? इंग्लंडच्या इतिहासातील एक कुप्रसिद्ध दरोडेखोर म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. त्याच्या नावे तीन मोठे दरोडे नोंद आहेत. मात्र, काही लोकांना तो निर्दोष वाटायचा. मार्च 1975 मध्ये जॉर्ज डेव्हिस याला 20 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या समर्थकांनी त्याच्या सुटकेसाठी बराच काळ आंदोलन केले होते. इसेक्स येथील लंडन इलेक्ट्रिसिटी बोर्ड कार्यालयात सशस्त्र दरोड्याच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरविण्यात आलेले. त्याने दरोडे सोडून लंडनमधील टॅक्सी चालवण्याचे काम सुरू केलेले. त्यामुळेच त्याच्या समर्थनार्थ “जॉर्ज डेव्हिस इज इनोसेंट” नावाची मोहीम देखील इंग्लंडमध्ये राबविली गेली.

जॉर्ज डेव्हिस प्रकरण तर काही मिटले नाही मात्र टेस्ट ड्रॉ झाली. यजमानांच्या हाता तोंडाशी आलेला विजय गेलेला. पुढची टेस्ट पण ड्रॉ राहिली आणि ऑस्ट्रेलियाने ऍशेस आपल्या नावे केली. मात्र, पिच खराब करण्याच्या घटनेने ऍशेसच्या गौरवशाली इतिहासावर काळा डाग नक्कीच लागला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
यशस्वी कर्णधाराचा विमान अपघात ते पाकिस्तानी कोचचा रहस्यमयी मृत्यू, वाचा क्रिकेटमधील न उलगडलेल्या घटना
विंबल्डन खेळलेला भारतीय क्रिकेटर, इंग्लंडमध्ये राहून टेनिसवर गाजवलं अधिराज्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---