- सहसचिवपदी उदय डोंगरे, यांची बिनविरोध निवड
- महाराष्ट्राला भारतीय तलवारबाजी संघात प्रथमच महत्त्वाची पदे
पुणे : भारतीय तलवारबाजी महासंघाच्या कोषाध्यक्षपदी अशोक दुधारे आणि सहसचिवपदी प्रा.डॉ. उदय डोंगरे यांची निवड झाली आहे. नुकत्याच रायपुर येथे झालेल्या भारतीय तलवारबाजी महासंघाच्या विशेष सर्वसाधारण सभेत २०१७-२०२१ ची कार्यकारिणी साठी निवडणूक संपन्न झाली यामध्ये त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्राला भारतीय तलवारबाजी संघात महत्वाची २ पदे मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अशोक दुधारे यांना महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट मार्गदर्शक व उत्कृष्ट क्रीडा संघटक असे दोनवेळा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविले असून ते महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे देखील सदस्य आहेत. गेल्या २५ वर्षाहूनअधिक काळ ते तलवारबाजी खेळाच्या प्रसार व प्रचारात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रमुख म्हणून काम पाहीले आहे.
प्रा.डॉ. उदय डोंगरे हे तलवारबाजी खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू असून महाराष्ट्र शासनाने त्यांना उत्कृष्ट खेळाडू व उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक असे दोन शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले आहे. कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयात क्रीडा प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. विविध देशांमध्ये भारतीय तलवारबाजी संघाचे प्रशिक्षक व संघ प्रमुख म्हणून देखील काम केले आहे.
अशोक दुधारे व प्रा.डॉ. उदय डोंगरे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काटुळे, उपाध्यक्ष शेषनारायण लोढे, श्रीछत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मानसिंग पवार, महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादवाड, साईचे सहसंचालक विरेंद्र भांडारकर, जिल्हा क्रीडा अधिकारी उर्मिला मोराळे, प्राचार्य डॉ. विजय भोसले, गोकुळ तांदळे, डॉ. दिनेश वंजारे, सागर मगरे, स्वप्निल तांगडे, अजय त्रिभुवन, संजय भुमकर, अजित खंबाट, राहुल दणके आदींनी अभिनंदन केले.