भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा झिम्बाब्वेच्या दौऱ्यास मुकला असला तरी, तो आगामी एशिया कपची (Asia Cup) कसून तयारी करत आहे. या स्पर्धेची सुरूवात २७ ऑगस्टपासून होणार आहे. युनायटेड अरब अमिराती येथे खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील पहिला सामना यजमान संघ श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. तर भारत या स्पर्धेतील पहिला सामना २८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या तणापूर्वक सामन्याबाबत रोहितने महत्वाचे वक्तव्य केले आहे.
भारत-पाकिस्तान (INDvsPAK) संघ २०२१मध्ये झालेल्या टी२० विश्वचषकानंतर आमनेसामने येणार आहेत. मागील वर्षी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर १० विकेट्सने मोठा विजय मिळवला होता. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने उत्तम गोलंदाजी केली होती. त्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान यांनी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावेळी मैदानावर जेवढे वातावरण तापलेले असते तेवढेच बाहेरही. या सामन्यात खेळाडूंनी कसा खेळ करावा आणि पाकिस्तान संघाला कसे सामोरे जावे याबाबत रोहित आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपले मत मांडले आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, “सगळ्यांची नजर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर असते. यामुळेच हा सामना दबाबवात्मकच होणार आहे. मात्र आम्हाला संघामध्ये सामन्य वातावरण निर्माण करायचे आहे. ज्यामुळे कोणताच खेळाडू दबावाखाली येणार नाही. जेव्हा आम्ही मैदानात उतरतो तेव्हा आमच्यासाठी इथे फक्त क्रिकेटच असते. मी आणि राहुल, आम्हा दोघांनाही खेळाडूंना सांगायचे आहे की तो एक विरोधी संघ आहे, त्याच्याकडे त्याच नजरेने पाहा.”
भारत सर्वाधिक वेळा बनलायं एशिया कपचा चॅम्पियन
भारतीय संघाचे एशिया कपमध्ये प्रचंड वर्चस्व आहे. भारताने सात वेळा एशिया कप जिंकला आहे. तर आगामी स्पर्धेत ते गतविजेता म्हणून उतरणार आहेत.
एशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत-पाकिस्तान एशिया कपमध्ये १४ वेळा समोरासमोर आली आहे. यातील ८ सामने जिंकण्यात भारताला यश आले आहे. तर पाकिस्तानने ५ सामने जिंकले आहेत. २०१६ नंतर प्रथमच ही स्पर्धा टी२० प्रकारामध्ये होत आहे. टी२०च्या पहिल्या हंगामात भारतच विजेता ठरला होता. तर त्याची पुनरावृत्ती करण्याचा हेतू भारताचा असणार आहे. तसेच एशिया कपच्या मागील हंगामांच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना कधी झालाच नाही.
एशिया कपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोल्हापूरच्या जामदारची अल्टिमेट खो-खो स्पर्धेत चमकदार कामगिरी
VIDEO। मुंबईच्या रस्त्यावर ‘विरुष्काची’ स्कूटर राईड! फॅन्स पासून वाचण्यासाठी वापरली खास आयडिया
कोहलीच्या फॉर्मवर आता चहलची गूगली! म्हणाला, ‘आपण फक्त…’