आशिया चषक 2023 स्पर्धेत शानदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तान संघासाठी सुपर- 4 फेरी अपेक्षेनुसार जात नाहीये. अलीकडेच रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून बाबर आझम याच्या संघाला सुपर- 4 फेरीच्या तिसऱ्या सामन्यात 228 धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या सामन्यातदरम्यानच पाकिस्तानच्या चिंता वाढल्या होत्या. कारण, हॅरिस रौफ आणि नसीम शाह हे भेदक गोलंदाज दुखापतग्रस्त झाले होते. दोघांनी फलंदाजी केली नव्हती. त्यानंतर माहिती समोर आली की, खांद्याच्या दुखापतीमुळे नसीम शाह आशिया चषक 2023मधून बाहेर पडला आहे. जमान खान याला त्याच्या जागी पर्याय म्हणून सामील करण्यात आले आहे.
अशात पाकिस्तानी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल (Pakistan bowling coach Morne Morkel) याने नसीम शाह याच्या अनुपस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान संघाला गुरुवारी (दि. 14 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध ‘करो या मरो’ सामना खेळायचा आहे. पाकिस्तानला आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचायचे असेल, तर हा सामना जिंकावा लागेल.
काय म्हणाला मॉर्केल?
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मॉर्केल म्हणाला, “नसीम शाह याचे बाहेर होणे निश्चितच मोठा धक्का आहे. दुर्दैवाने त्याला थोड्या वेदना होतायेत. जो संघात येत आहे, त्याच्यासाठी शानदार संधी आहे. भारताविरुद्ध सामना गमावल्यानंतर आमच्यासाठी ही करो या मरो स्थितीचा सामना आहे. मी संघात सामील होणाऱ्या युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. भारताविरुद्धच्या सामन्यानंतर आम्ही निराश झालो होतो.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “माझ्यासाठी हे गरजेचे आहे की, गोलंदाजांनी स्वत:शीच कठोर प्रश्न विचारावे. होय, भारतीय फलंदाजांनाही श्रेय जाते. त्यांनी सुरुवातीला आम्हाला दबावात टाकले. विश्वचषकापूर्वी आमच्यासाठी हा मोठी शिकवण ठरली. आम्ही हा धडा घेऊन दमदार पुनरागमन करू.”
खरं तर, पाकिस्तान संघाने श्रीलंकेला पराभूत केले, तर त्यांना आशिया चषक 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर श्रीलंका संघ चांगल्या नेट रनरेटच्या आधारे अंतिम सामन्यात प्रवेश करेल. भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे आणि 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी विरोधी संघाची प्रतीक्षा करत आहे. (asia cup 2023 pak coach morne morkel says losing naseem shah big blow for pakistan read)
हेही वाचा-
बोंबला! बाबरसेनेवर भडकली पाकिस्तानी अभिनेत्री, FIR करणार दाखल; आख्ख्या संघाला दिली खुली धमकी, पण का?
ट्रेंट बोल्टने रचला इतिहास! इंग्लंडच्या पाच विकेट्स घेत बनला इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज