आशिया चषक 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. भारतीय संघाने सुपर- 4 स्पर्धेत आधी पाकिस्तान आणि नंतर श्रीलंका संघांना पराभूत करून अंतिम सामन्यात एन्ट्री केली होती. तसेच, आता पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात अंतिम सामन्याच्या तिकीटासाठी गुरुवारी (दि. 14 सप्टेंबर) लढत होणार आहे. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
परंतु एक प्रश्न उपस्थित झाला आहे. खरं तर, संपूर्ण आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेवर पावसामुळे संघांना खूपच त्रास सहन करावा लागला आहे. कोलंबोमधील हवामानाविषयी बोलायचं झालं, तर 40 ते 50 टक्के पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अशात जर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघातील सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोणता संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल, हा मोठा प्रश्न असणार आहे. चला तर, याविषयी जाणून घेऊयात…
गुणतालिकेची स्थिती
आशिया चषक 2023 सुपर- 4 (Asia Cup 2023 Super- 4) फेरीतील गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघ अव्वलस्थानी कायम आहे. एवढंच नाही, तर भारताने शानदार नेट रनरेटच्या आधारे थेट अंतिम सामन्याचे तिकीटही मिळवले आहे. भारतीय संघाचा नेट रनरेट 2.690 आहे. तसेच, श्रीलंका आणि पाकिस्तान संघांनी या फेरीतील प्रत्येकी 1 सामना जिंकला आणि 1 सामना गमावला आहे. दोन्ही संघांकडे 2-2 गुण आहेत. मात्र, श्रीलंकेचा -0.2 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट खूपच खराब म्हणजे -1.892 इतका आहे.
बाबर आझम याचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी कायम आहे. बांगलादेश संघ पहिले दोन्ही सामने गमावत स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट आहे की, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (Pakistan vs Sri Lanka) सामना जो जिंकेल, त्याला अंतिम सामन्यात प्रवेश मिळेल. मात्र, पावसाने व्यत्यय आणला, तर समीकरण बिघडू शकते.
काय आहे समीकरण?
समीकरणांविषयी बोलायचं झालं, त गुणतालिकेतील स्थितीवरून स्पष्ट होते की, पाकिस्तानचा नेट रनरेट खूपच खराब आहे. अशात जर पावसाने हा सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना एक-एक गुण मिळेल आणि दोघांचे समान 3-3 गुण होतील. अशात श्रीलंका संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल. कारण, श्रीलंकेचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. तसेच, सामना खेळला गेला आणि पाकिस्तानने विजय मिळवला, तर त्यांची अंतिम सामन्यातील जागा पक्की होईल.
विशेष म्हणजे, कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवरच स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. (asia cup 2023 rain washed out pakistan vs sri lanka match know who will face india in the final read)
हेही वाचा-
‘मला आधीपासूनच माहिती होते, मी वर्ल्डकप खेळणार, पण…’, स्टोक्सचा खळबळजनक खुलासा
“सध्या विराटपेक्षा मोठा कोणीच नाही”, स्मिथने दिली खुल्या दिलाने कबुली





