टीम इंडियानं 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया कप जिंकला होता. आता पुढील आशिया कप कधी आणि कुठे होणार, याची माहिती समोर आली आहे. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. रोहित-विराटनं गेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असली, तरी हे दोन दिग्गज पुढील आशिया कपमध्ये खेळणार नाहीत. या मागचं कारण काय आहे, हे या बातमीद्वारे जाणून घ्या.
आशिया कप दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो. ‘क्रिकबझ’च्या अहवालानुसार, 2025 आशिया कप भारतात आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर 2027 चा आशिया कप बांगलादेशमध्ये होईल. 2029 मध्ये पाकिस्तान या स्पर्धेचं आयोजन करणार आहे. तर 2031 चा आशिया कप श्रीलंकेमध्ये आयोजत केला जाईल.
पुढच्या वर्षी, म्हणजेच 2025 मध्ये जेव्हा भारतात आशिया कप आयोजित केला जाईल, तेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहली का खेळणार नाहीत? यामागील कारण म्हणजे, 2025 आशिया कप टी20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे. विराट आणि रोहितनं 2024 टी20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे हे दोघे या स्पर्धेसाठी उपलब्ध असणार नाहीत.
2025 आशिया कप डिसेंबर महिन्यात आयोजित केला जाऊ शकतो. पुढील टी20 विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये आयोजित केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, विश्वचषकाच्या तयारीसाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.
चाहत्यांना रोहित-विराट 2027 च्या आशिया कपमध्ये खेळताना दिसू शकतात. याचं कारण म्हणजे, ही स्पर्धा एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळली जाणार आहे.
आगामी आशिया कप आणि आयोजक
2025 – भारत (टी20 फॉरमॅट)
2027 – बांगलादेश (एकदिवसीय फॉरमॅट)
2029 – पाकिस्तान (टी20 फॉरमॅट)
2031 – श्रीलंका (एकदिवसीय फॉरमॅट)
हेही वाचा –
संजूचे नशीब उजळले! सूर्याच्या नेतृत्तवात नव्या भुमिकेत दिसणार, सामन्यापूर्वी संघात मोठे बदल!
“रोहित शर्मा आरसीबीमध्ये जाणार का?”, एबी डिव्हिलियर्सचं सूचक वक्तव्य; हार्दिकचाही उल्लेख
पहिल्या टी20 मध्ये भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? पिच रिपोर्ट आणि सामन्याचा अंदाज जाणून घ्या






