आशिया चषक 2022 च्या अंतिम सामन्याला दुबई येथे सुरुवात झाली. नसीम शाह व हारिस रऊफने पावर प्लेमध्ये श्रीलंकेची दाणादाण उडविली. मात्र, भानुका राजपक्षे व वनिंदू हसरंगा यांनी संघाला सामन्यात पुनरागमन करून देत निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 पर्यंत मजल मारून दिली. राजपक्षेचे अर्धशतक श्रीलंकेच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.
दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय युवा वेगवान गोलंदाज नसीम शहा याने पहिल्या षटकात योग्य ठरवला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या कुसल मेंडीसचा त्याने शून्यावर त्रिफळा उडविला. दुसरा सलामीवीर पथुम निसंका 8 व धनुष्का गुणथिलका एका धावेवर माघारी परतले. या दोघांना हारिस रऊफने तंबूचा रस्ता दाखवला. चांगल्या लयीत दिसत असलेल्या धनंजय डी सिल्वाला इफ्तिखारने 28 धावांवर बाद केले. कर्णधार दसून शनाका हा या अंतिम सामन्यात अपयशी ठरला. त्यानंतर आलेल्या वनिंदू हसरंगाने भानुका राजपक्षेला साथ देत वेगवान फलंदाजी केली. दोघांनी शानदार अर्धशतकी भागीदारी करत संघाला शतकी मजल मारून दिली. हसरंगा 21 चेंडूवर 36 धावांची खेळी करत बाद झाला. हसरंगा बाद झाल्यानंतरही राजपक्षेने आपले आक्रमण कायम ठेवले व 35 चेंडूवर स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 45 चेंडूवर 45 चेंडूवर नाबाद 71 धावा केल्या. पाकिस्तानसाठी वेगवान गोलंदाज हारिस रऊफने सर्वाधिक तीन बळी मिळवले. नसीम शाह, शादाब खान व इफ्तिखार अहमद यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.