आशिया चषक 2022 च्या तिसऱ्या सुपर फोर सामन्यात भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान सामना रंगला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. पाकिस्तानविरुद्ध आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभूत व्हावे लागले होते. या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना अतिशय नियोजनबद्ध फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात 8 बाद 173 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माचे वादळी अर्धशतक भारतीय डावाचे वैशिष्ट्ये ठरले.
Sri Lanka restrict India after Rohit Sharma's onslaught ????
Can they chase this down?#INDvSL | #AsiaCup2022 | ???? Scorecard: https://t.co/914FlwDKK0 pic.twitter.com/OORIcn2Xle
— ICC (@ICC) September 6, 2022
भारतीय संघाच्या सामन्यातील सुरुवात अत्यंत खराब झाली होती. केएल राहुल पंचांच्या एका खराब निर्णयाचा शिकार झाला व केवळ सहा धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेला विराट कोहली 4 चेंडू खेळून मधुशंका याच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडलेला असताना रोहितने कर्णधाराला साजेशी अशी खेळी केली. त्याने कोणताही दबाव न घेता खराब चेंडूंवर हल्ले चढवत षटकार चौकार वसूल केले.
सूर्यकुमार यादव याच्यासह त्याने शानदार 97 धावांची भागीदारी केली. रोहितने आपले अर्धशतक केवळ 32 चेंडूंमध्ये पूर्ण केले. त्यानंतर सलग दोन षटकार खेचत त्याने आपले आक्रमण आणखी वाढवले. मात्र, करूणारत्ने याच्या विरुद्ध मोठा फटका खेळण्याचा नादात आपला बळी गमावला. बाद होण्यापूर्वी त्याने 42 चेंडूवर 5 चौकार व 4 षटकार ठोकत 71 धावा केल्या. रोहितनंतर सूर्याही 34 धावांवर बाद झाला.
त्यानंतर भारतीय डावाला दोन षटके खिळ बसली. मात्र, हार्दिक पंड्या व रिषभ पंत यांनी काही मोठे फटके खेळत संघाची धावसंख्या वाढवली. हार्दिक 17 धावा करत बाद झाला. रिषभ पंत सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. त्यानंतर दीपक हुडा देखील केवळ 3 धावा करू शकला. रविचंद्रन अश्विनी अखेरच्या षटकात षटकार खेचत भारताची धावसंख्या 170 पार नेली. त्याने नाबाद 15 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेसाठी मधुशंका याने तीन तर, करूणारत्ने व शनाकाने प्रत्येकी दोन बळी आपल्या नावे केले.






