आशियाई क्रिकेट मधील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशि चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. सुपर 4 फेरीत अव्वल राहिलेले भारत आणि श्रीलंका हे संघ अंतिम सामन्यात एकमेकांशी दोन हात करतील. यावेळी आशिया चषक जिंकून भारतीय संघ तब्बल आठव्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे करणार की यजमान श्रीलंका भारताला पछाडत सातव्यांदा आशिया चषक जिंकून भारताची बरोबरी करणार का याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमी लक्ष देऊन आहेत. या अंतिम सामन्यापूर्वी आपण स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांवर नजर टाकूया.
आत्तापर्यंत सोळा वेळा आयोजित झालेल्या या स्पर्धेत चौदा वेळा वनडे प्रारूपात ही स्पर्धा झाली आहे. तर, दोन वेळा टी20 स्वरूपात आशिया चषक खेळला गेलेला. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज हा श्रीलंकेचा सनथ जयसूर्या असून, त्याने 25 सामन्यांमध्ये 53 पेक्षा जास्तच्या सरासरीने 1220 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर देखील श्रीलंकेचाच माजी कर्णधार कुमार संगकारा असून त्याने 24 सामन्यात 1075 धावा केल्या होत्या.
आशिया चषक इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा मान आतापर्यंत तरी सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने 23 सामने खेळताना 51.10 च्या सरासरी 971 धावा केल्या होत्या. भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असून त्याच्या खात्यात 939 धावा जमा आहेत. त्याच्याकडे या यादीत अंतिम सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची संधी असेल. तर, बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकूर रहीम 830 धावांसह पाचव्या क्रमांकावर उभा आहे.
या व्यतिरिक्त टॉप टेनमध्ये पाकिस्तानचा शोएब मलिक 786 धावा, भारताचा विराट कोहली 742 धावा, श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा 741 धावा, श्रीलंकेचा माहेला जयवर्धने 674 धावा व भारताचा एमएस धोनी 648 धावांसह सामील आहेत.
(Asia Cup Most Runs In Asia Cup History Jayasurya Tops Rohit At 4)
महत्वाच्या बातम्या –
रोहित-तिलकच्या निराशाजनक विकेट्स, वेगवान गोलंदाजामुळे बांगलादेशची शानदार सुरुवात
शाकिबच्या धमाक्यामुळे बांगलादेशची आव्हानात्मक धावसंख्या! भारतासाठी शार्दुल पुन्हा चमकला






