माफुशी (मालदीव), दि. 20। 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मास्टर्स गटात भारतच गोल्ड मास्टर ठरला. सुभाष पुजारींपाठोपाठ आज बलदेव कुमार यांनी 50 ते 60वर्षे वयोगटात तर तरूण कुमार चॅटर्जी यांनी 60ते 70 वर्षे गटात सोनेरी कामगिरी करीत भारताला आणखी दोन सुवर्ण पदके जिंकून दिली. विशेष म्हणजे पुजारींप्रमाणे बलदेव कुमारही पोलीस इन्स्पेक्टर आहेत.भारताने स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी 2 सुवर्ण पदकांसह 6 रौप्य आणि 3 कांस्य पदके जिंकत 11 पदकांची कमाई केली.
भारताला स्पर्धेचा तिसरा दिवसही सोनेरी ठरला. आज शरीरसौष्ठवाच्या मुख्य स्पर्धेला सुरूवात झाली. आज झालेल्या तीन गटात भारताला एकही सुवर्ण जिंकता आले नसले तरी 55 किलो वजनी गटात आर. के सुरेशने तर 65 किलो वजनी गटात बिचित्र नायकने रौप्य जिंकले. 60 किलो वजनी गटात एम. विघनेश कांस्य पदकाचा मानकरी ठरला.
मास्टर्समध्ये भारतीय सिंघमची कमाल
भारताच्या मास्टर्स खेळाडूंनी खऱ्या अर्थाने कमाल केली. काल नवी मुंबईचे पोलीस इन्स्पेक्टर सुभाष पुजारी यांनी सुवर्ण जिंकले होते तर आज चंदीगडचे 53 वर्षीय पोलीस इन्स्पेक्टर बलदेव कुमार यांनी 50 ते 60 वर्षे वयोगटाच्या 80 किलोवरील वजनी गटात तरूणांनाही लाजवेल असे शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन करीत बाजी मारली. या गटात सत्यनारायण राजू दुसरे आले. त्यानंतर झालेल्या 60 वर्षावरील वजनी गटात 66 वर्षीय तरूण कुमार चॅटर्जी यांनी सोनेरी यश संपादले. या गटात 73 वर्षीय व्ही. रथिनम यांची पीळदार शरीरयष्टी पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले. भारताने मास्टर्स शरीरसौष्ठवाच्या पाचही गटात पदके जिंकली. विशेष म्हणजे 3 सुवर्णपदकांसह 3 रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण आठ पदकांची कमाई भारताच्या मास्टर्सने केली. आता शरीरसौष्ठवाच्या मुख्य गटातही भारतीय दिग्गजांकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
मलेशियन अनचाहचा सोनेरी धमाका
शरीरसौष्ठव स्पर्धेच्या 65 किलो वजनी गटात तरूण खेळाडूंवर मात करीत मलेशियाच्या बुडा अनक अनचाहने सर्वांचीच मने जिंकली. या गटात भारताच्या बिचित्र नायकचे सुवर्ण हुकले आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेपाठोपाठ झालेल्या 50 ते 60 वर्षे वयाच्या 80 किलो वजनी गटाच्या मास्टर्स स्पर्धेतही अनचाह उतरला आणि त्याने सहजपणे सुवर्ण जिंकले. या वयोगटात त्याच्या तोडीचा एकही शरीरसौष्ठवपटू नव्हता. अनचाहने या सोनेरी यशासह लागोपाठ दोन सुवर्ण जिंकून संस्मरणीय कामगिरी करून दाखविली.
54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल
मुख्य शरीरसौष्ठव : 55 किलो वजनी गट – 1.मोहमद मूसा (मालदीव), 2. आर.के. सूरज (भारत), 3. फमवान माच (व्हिएतनाम), 4. सोनू (भारत), 5. क्याव मिन थान (म्यानमार).
60 किलो वजनी गट- 1. जिराफन पोंगकाम (थायलंड), 2.मलवर्न अब्दुल्ला (मलेशिया), 3. विग्नेश एम. (भारत), 4.वुआन खुआँग (व्हिएतनाम), 5. कॉर्नेलिस (इंडोनेशिया).
65 किलो वजनी गट – 1.बुडा अनक अनचाह (मलेशिया), 2.बिचित्र नायक ( भारत), 3.त्रान बाओ कुओक वुआँग (व्हिएतनाम), 4. अमीन रसूद (मलेशिया), 5.जक्कावत इंतरंगसी (थायलंड).
मास्टर्स शरीरसौष्ठव : 50 ते 60 वय (80 किलो)- 1. 1.बुडा अनक अनचाह (मलेशिया), 2. सुरेश कुमार (भारत), सर्वनन हरीराम (भारत).
50 ते 60 वय (80 किलोवरील)- 1.बलदेव कुमार (भारत), 2. के. सत्यनारायण राजू (भारत), 3.वोंग होइंग (मलेशिया), 4. स्टिफन जोस ( भारत).
60 वर्षावरील गट – 1. तरूण कुमार चॅटर्जी (भारत), 2. व्ही. रथिनम (भारत), 3. मॅथ्यू राजवर्मा (सिंगापूर).
पुरूष ऍथलेटिक फिजीक (160 सेमी)- 1. फमवान फुओक (व्हिएतनाम), 2. फतुहुल्ला मोहमद (मालदीव), 3. मोहमद झिधान (मालदीव), 4. हुशाम हमीद (मालदीव).
पुरूष ऍथलेटिक फिजीक (167 सेमी)- 1. नोरा छिंग (कंबोडिया), 2.सय्यद फैझल (मलेशिया), 3. मोहमद सयरूल (मलेशिया), 4. ले वॅन व्हिएत (व्हिएतनाम), 5. मनाफ वाहिद (मालदीव).
पुरूष ऍथलेटिक फिजीक (182 सेमी)- 1. मिलाद नझेमी (इराण), 2. दिपक शेरावत (भारत), 3. हूमन अब्बासी (इराण), 4. कोंगफूल थंगसूक (थायलंड), 5. निशांत (भारत).
पुरूष ऍथलेटिक फिजीक (182 सेमीवरील)- 1. सोहैल बसमी ( इराण), 2. कपिल कुमार (भारत), 3.दमरोंगसाक (थायलंड).
महत्वाच्या बातम्या-