पुढील महिन्याच्या 18 तारखेपासून 18 व्या एशियन गेम्सला सुरवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय कबड्डी संघ सलग 8 वे सुवर्णपदक मिळवेल असा भारताचा कर्णधार अजय ठाकूरने विश्वास व्यक्त केला आहे.
या स्पर्धेबद्दल बोलताना अजय ठाकूर म्हणाला, “भारताचे पुरुष आणि महिला संघ अनुक्रमे सलग आठवे आणि तिसरे सुवर्णपदक मिळवण्यासाठी सज्ज आहेत. आमच्या खेळाडूंनी सातत्याने आपली ताकद सिद्ध करत दबावाखालीही चांगला खेळ केला आहे.”
“नुकत्याच पार पडलेल्या कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत मिळवलेल्या विजेतेपदामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. आम्ही या स्पर्धेत एशियन गेम्समध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तान आणि इराण संघाविरुद्धही खेळलो. हीच सकारात्मकता एशियन गेम्समध्येही कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
तसेच बाकी संघांबद्दल बोलताना ठाकूर म्हणाला, एशियन गेम्समध्ये सहभागी झालेल्या संघांपैकी इराण, पाकिस्तान आणि दक्षिण कोरिया आव्हानात्मक असतील. या संघांकडे युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले संतुलन आहे.
तसेच तो असेही म्हणाला की प्रो कबड्डीमध्ये खेळाडूंना या खेळात कारकिर्द घडवण्याची चांगली संधी मिळते.
यावेळी पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये 12 देशांचे पुरुष संघ आणि 9 देशांचे महिला संघ सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत 1990 पासून फक्त 7 देशांच्या पुरुषांचे संघ सहभागी होत होते. तसेच महिला संघांचा सहभाग 2010 पासून एशियन्स गेम्समध्ये करण्यात आला आहे.
तसेच आत्तापर्यंत भारतीय पुरुष संघ एशियन गेम्समध्ये अपराजीत राहिला आहे. त्यांनी 1990 ते 2014 पर्यंत खेळलेल्या सातही एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
त्याचबरोबर भारतीय महिला संघानेही 2010 आणि 2014 अशा दोन्ही एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.
यावर्षीची एशियन गेम्स स्पर्धा इंडोनेशियामधील जकार्ता येथे 18 आॅगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. यात 19 आॅगस्ट ते 24 आॅगस्ट दरम्यान कबड्डीच्या स्पर्धा होतील.
महत्त्वाच्या बातम्या:
–युरो २०१६ त्याने प्रेक्षक म्हणून पाहिला आणि आता बनला विश्वविजेता !
–सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, इंग्लंडमध्ये सुरु केली क्रिकेट आकादमी
–विराट कोहलीने वनडे क्रमवारीत केला हा खास विक्रम