-शारंग ढोमसे (Twitter- @ranga_ssd)
आशिया खंडातील ‘ऑलिम्पिक’ म्हणून आशियाई खेळांकडे बघितले जाते.कबड्डीला ऑलिम्पिक मध्ये स्थान नाही त्यामुळे आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक मिळवणे ही कोणत्याही कबड्डी खेळाडूसाठी सर्वोच्च कामगिरी ठरते.आशियाई खेळांची सुरवात जरी १९५१ साली झाली तरी त्यात कबड्डीला आपली जागा मिळवण्यासाठी १९९० सालापर्यंत वाट पाहावी लागली.तत्पूर्वी १९८२ साली नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ९ व्या आशियाई खेळांमध्ये कबड्डी चे प्रदर्शनी सामने भरवण्यात आले होते.
कबड्डी खेळ ज्या भारताने या जगाला दिला त्याने या स्पर्धेत आपला दबदबा राखणे स्वाभाविकच आहे मात्र १९९० पासून ते २०१४ निर्भेळ यश मिळवणे ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.भारताने आतापर्यंत या स्पर्धेत सर्वच्या सर्व म्हणजे तब्बल ९ सुवर्णपदक जिंकले आहेत ज्यात महिलांचे २ तर पुरुष संघाचे ७ सुवर्णपदक समाविष्ट आहेत.अगदी अलीकडे म्हणजे २००६ पर्यंत, पाकिस्तान संघाचा एखादा दुसरा अपवाद वगळता कोणताही संघ भारतापुढे कडवे आव्हान उपस्थित करू शकला नाही.
कबड्डी हा बांग्लादेश चा राष्ट्रीय खेळ तर पाकिस्तानातही हा खेळ मोठया प्रमाणावर खेळला जातो.१९९० ते २००६ या काळात या दोन्ही संघांनी आलटून पालटून भारताविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आणि भारताने तो जिंकायचा असे समीकरणच झाले होते.प्रतिस्पर्धी कोणीही असो भारताचे सुवर्णपदक नक्की!१९९०,१९९४ आणि २००२ साली बांग्लादेश ने रौप्यपदक मिळवले तर १९९८ आणि २००६ साली पाकिस्तान रौप्यपदक मिळवण्यात यशस्वी ठरले.
२०१० चे १६ वे आशियाई खेळ हे कबड्डीच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने क्रांतिकारी म्हणावे लागतील.याची २ कारणे आहेत एक तर जागतिक कबड्डी समीकरणात इराण चा झालेला उदय आणि दुसरे म्हणचे या स्पर्धेची दारे पहिल्यांदाच महिला कबड्डीसाठी उघडण्यात आली!२००६ च्या आशियाई स्पर्धेतच इराणने ४ थे स्थान पटकावत आपल्या आगमनाची चाहूल दिली होती.
२०१० साली त्यांनी थेट अंतिम फेरी गाठत पाकिस्तान आणि बांग्लादेश ला तर मागे सोडलेच पण भारतापुढेही दमदार आव्हान उभे केले.२०१४ साली पार दक्षिण कोरियात पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये तर इराण ने अंतिम फेरीत भारताची चांगलीच दमछाक केली.मध्यंतरालाच इराणचा संघ ८ गुणांची आघाडी घेऊन बसला होता त्यामुळे भारताचे सुवर्णपदक जाते की काय अशी परिस्थिती आली होती. मात्र मध्यंतरानंतर भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारत विजयश्री खेचून आणली आणि तो सामना जिंकला पण फक्त २ गुणांच्या फरकाने!
महिला गटातही इराण ची कामगिरी उल्लेखनीय आहे मात्र भारतीय संघाचा विजयी रथ रोखणे त्यांनाही शक्य झालेले नाही.२०१० आणि २०१४ या दोन्ही स्पर्धांत भारतीय संघाने पूर्णतः वर्चस्व राखत सुवर्ण कामगिरी केली आहे.२०१० ला थायलंडला तर २०१४ ला इराण ला नमवत त्यांनी ही कामगिरी केली.मात्र २०१० साली उपांत्य फेरीत इराण ने भारतीय संघाला चांगलेच झुंजवले होते,केवळ १ गुणाने भारतीय संघाने निसटता विजय मिळवला होता तर २०१४ साली अंतिम फेरीतही इराण ने भारताला चांगलेच दडपणाखाली आणले होते.
इराण बरोबरच दक्षिण कोरिया हा असा संघ आहे जो कोणालाही आश्चर्यचकित करू शकतो.याचे उदाहरण म्हणजे २०१६ साली झालेल्या विश्वचषकाचा उदघाटनाचा सामना ज्यात कोरिया ने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत भारतीय संघाला पराभूत केले.कोरिया च्या महिला संघाने ही इराण मध्ये पार पडलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत(२०१७) इराण ला पराभवाचा धक्का दिला होता.त्यामुळे या देशाच्या धक्का तंत्रापासून सावध राहणे भारतीय संघांच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान देखील मजबूत संघ आहे,आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत(२०१७) इराण ला नमवून त्यांनीही ‘हम भी किसीसे कम नही’ असा इशारा दिला आहे.
१८ व्या आशियाई खेळांमध्ये भारतीय संघ पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी साठी सज्ज असतील मात्र इराण चे संघही भारताची मक्तेदारी मोडण्यास आतुर असतील.इराण मध्ये पार पडलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत जरी इराणचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत गारद झाले असले तरीही या संघांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ नक्कीच करणार नाहीत.
२०१४ च्या आशियाई स्पर्धा आणि २०१६ चा विश्वचषक स्पर्धेचा अनुभव बघता भारतीय पुरुष संघाने तर अजिबातच गाफील राहू नये!मात्र भारतीय संघ अप्रक्षेप्रमाणे खेळ करत पुन्हा एकदा २ सुवर्णपदक घेऊन परततील असा विश्वास नक्कीच वाटतो!!
पदक तालिका (पुरुष व महिला एकत्रित):
भारत: सुवर्ण- ९
बांग्लादेश: रौप्य- ३, कांस्य- ४
इराण: रौप्य- ३, कांस्य- १
पाकिस्तान: रौप्य- २, कांस्य- ५
थायलंड: रौप्य- १, कांस्य- १
जपान: कांस्य- १
द.कोरिया: कांस्य- १
क्रिकेटवरील “मुंबई क्रिकेट सफरनामा ” लेखमालिकेतील काही खास लेख-
–मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- १: मुंबईतील क्रिकेटचा इतिहास आणि मूलभूत जडणघडण
– मुंबई क्रिकेट सफरनामा भाग- २: मुंबईत कसोटीचे आगमन आणि स्वातंत्र्यपूर्व क्रिकेट