आयपीएलचा १५ वा हंगाम (IPL 2022) २६ मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामासाठी श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी (११ मार्च) पॅडी अप्टनलाही संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली.
श्रीलंकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये ३४० सामन्यांत ५४६ विकेट घेणारा मलिंगा राजस्थानच्या वेगवान गोलंदाजांसोबत काम करताना दिसणार आहे. मलिंगा म्हणाला, “आयपीएलमध्ये पुनरागमन करणे ही खूप चांगली भावना आहे आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामील होणे ही सुद्धा सन्मानाची गोष्ट आहे. संघाकडे असलेल्या वेगवान गोलंदाजी युनिटबद्दल मी खूप उत्सुक आहे. मी सर्व वेगवान गोलंदाजांना त्यांच्या खेळाच्या योजना आणि विकासासाठी मदत करण्यास उत्साही आहे.”
मलिंगा आयपीएलमध्ये ५ वेळचा विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सचा भाग होता. ३८ वर्षीय मलिंगाने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १२२ सामन्यांत १७० विकेट घेतल्या आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा राजस्थान संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पॅडी अप्टन रॉयल्स संघात परतला आहे. याअगोदर तो २०१३ ते २०१५ या काळात संघाचा प्रशिक्षक होता आणि त्यानंतर २०१९ मध्ये तो संघात दाखल झाला. २०१३ ते २०१५ दरम्यान संघ सातत्याने अव्वल-४ मध्ये पोहोचला. तो पहिले चार आठवडे संघासोबत असेल आणि त्यानंतर तो संघाला ऑनलाइन पद्धातीने मदत करेल.
लसीथ मलिंगा हा आयपीएलच्या सर्वात यशस्वी गोलंदाजपैकी एक आहे. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. मलिंगाने २००९ मध्ये आयपीएलमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि २०१९ पर्यंत या लीगमध्ये खेळत राहिला. आयपीएलमध्ये खेळलेल्या ९ हंगामात त्याने एकूण १२२ सामने खेळले आणि या कालावधीत त्याने १७० विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत मलिंगा अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. १३ धावांत ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
आयपीएल २०२२ स्पर्धा २६ मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएलचे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथे पार पडणार आहेत. य़ावर्षी १० संघ खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! आरसीबी संघ ‘या’ दिवशी करणार आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा; वाचा सविस्तर
केकेआरचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर; आता ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला केले ताफ्यात सामील






