मेलबर्न। आज(18 जानेवारी) भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी खिशात घातली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 231 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारताकडून यष्टीरक्षक एमएस धोनीने 114 चेंडूत नाबाद 87 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आहे. त्याला केदार जाधवने नाबाद 61 धावा करत योग्य साथ दिली आहे.
धोनीचे या मालिकेतील हे तिसरे अर्धशतक होते. त्याने या वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात 51 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 55 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही देण्यात आला असून हा त्याचा सातवा मालिकावीर पुरस्कार ठरला आहे.
त्याचबरोबर वनडेत मालिकावीर पुरस्कार मिळवणारा तो भारताचा सर्वात वयस्कर क्रिकेटपटूही ठरला आहे. हा पुरस्कार स्विकारताना त्याचे वय 37 वर्षे 195 दिवस इतके आहे. याआधी हा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर होता. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 1987 मध्ये 37 वर्षे 191 दिवस इतके वय असताना मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता.
धोनी या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे. त्याने या मालिकेत 193 च्या सरासरीने 3 अर्धशतकांसह 193 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर धोनीने वनडेत सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहली, युवराज सिंग, सौरव गांगुली यांच्या 7 मालिकावीर पुरस्कारांची बरोबरी केली आहे.
त्यामुळे तो आता या क्रिकेटपटूंसह या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत 15 मालिकावीर पुरस्कारांसह सचिन अव्वल क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–एमएस धोनीच्या शानदार खेळीने रिकी पॉंटींगचाही विक्रम मोडीत
–टीम इंडियाचा नादच खूळा! कोणत्याही संघाला जमले नाही ते करुन दाखवले
–ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेप्रमाणेच वनडेतही टिम इंडियाने रचला इतिहास