धरमशाला। भारत विरुद्ध श्रीलंका संघात रविवारी (२७ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना सामना पार पडला. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. त्यामुळे भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली आपली विजयी लय कायम ठेवली.
अन् रोहिने वर्तुळ पूर्ण केले
खरंतर २०१७ साली धरमशाला येथेच रोहितने सर्वात पहिल्यांदा भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्त्व केले होते. त्यावेळी तो प्रभारी कर्णधार म्हणून श्रीलंकेविरुद्ध टी२० सामना खेळला होता. त्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला होता. श्रीलंकेने ७ विकेट्सने भारताला पराभूत केले होते. पण त्यानंतर रोहितने भारताचे नेतृत्त्व करताना शानदार कामगिरी केली आणि आता रोहितने श्रीलंकेविरुद्धच धरमशाला येथे विजय मिळवत एकप्रकारे एक वर्तुळ पूर्ण केले आहे.
विशेष म्हणजे आता रोहित भारताचा तिन्ही क्रिकेट प्रकारात पूर्णवेळ कर्णधार आहे. त्याने २०१७ सालापासून आत्तापर्यंत भारतीय संघाचे भारतात २४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्त्व केले. यातील २२ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर २ सामन्यात पराभव पत्करला आहे. भारताने रोहितच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेविरुद्ध २०१७ साली धरमशाला येथे पराभव स्विकारल्यानंतर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध दिल्ली येथे झालेल्या टी२० सामन्यात पराभवाचा सामना केला. या दोन पराभवांव्यतिरिक्त भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारतात पराभव स्विकारलेला नाही.
महत्त्वाचे म्हणजे रोहित जेव्हापासून भारताच्या संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाला आहे, तेव्हापासून भारताने आत्तापर्यंत एकदाही पराभव स्विकारलेला नाही. भारताने रोहितच्या नेतृत्त्वाखाली यावर्षी न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंका संघांना व्हाईटवॉश देण्याचा कारनामा केला आहे.
मायदेशात रोहित यशस्वी टी२० कर्णधार
रविवारी श्रीलंकेविरुद्ध तिसरा टी२० सामना जिंकून रोहित मायदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकणारा कर्णधार बनला आहे. हा विजय भारताचा रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील १७ वा टी२० विजय होता. आत्तापर्यंत कोणत्याच कर्णधाराला आपल्या संघाला मायदेशात १६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकून देता आलेले नाहीत. या यादीत इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी आपापल्या संघाचे मायदेशात नेतृत्त्व करताना प्रत्येकी १५ विजय मिळवून दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
मोहम्मद सिराजच्या केसांवरून युझवेंद्र चहलने उडवली खिल्ली; म्हणाला, ‘असं वाटतंय, गवत सुखलंय आणि…’
टीम इंडिया विजयीरथावर आरुढ! सलग १२ वा टी२० सामना जिंकत ‘या’ दोन संघांची विश्वविक्रमात बरोबरी
प्रायवेट पार्टवर चेंडू लागूनही वेंकटेशन अय्यरने घेतला महत्त्वाचा झेल, पाहा व्हिडिओ