इंदोर । दिल्ली कर्णधार रिषभ पंतने मोठा विक्रम केला आहे. त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एखाद्या संघाचं सर्वात कमी वयात नेतृत्व करण्याचा विक्रम केला आहे.
आज त्याने कर्णधार म्हणून मैदानात जेव्हा नाणेफेकीसाठी पाऊल ठेवले तेव्हा हा विक्रम त्याच्या नावावर झाला. १९९४-९५ मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पंजाब विरुद्ध मुंबई संघाचे नेतृत्व केले होते. तेव्हा सचिन मुंबई संघाचा पूर्णवेळ सदस्य होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला त्याच्या ६वर्ष पूर्ण आहे.
रिषभ पंतने हा विक्रम मोडणे यासाठी खास ठरले आहे कारण जेव्हा हा मोसम सुरु झाला तेव्हा तो संघाचा उपकर्णधारही नव्हता. या संघाचा स्पर्धेत कर्णधार म्हणून इशांत शर्माने तर उपकर्णधार म्हणून मिलिंद कुमारने जबाबदारी पार पाडली होती. परंतु जेव्हा इशांत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाला तेव्हा मिलिंद कुमारकडे ही जबाबदारी देण्याऐवजी समितीने रिषभ पंतवर विश्वास दाखवला.
रिषभ पंतचे सध्याचे वय हे २० वर्ष आणि ८६ दिवस आहे तर जेव्हा मास्टर ब्लास्टरने मुंबई संघाचे अंतिम सामन्यात नेतृत्व केले तेव्हा सचिनचे वय हे २१ वर्ष आणि ३३७ दिवस होते.