पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने वर्चस्व मिळवले आहे. ४८६ धावांचा डोंगर उभारल्या नंतर भारताने श्रीलंकेला पहिल्या डावात१३५ धावत गुंडाळले आहे. भारताकडे ३५२ धावांची मोठी आघाडी होती. त्यानंतर पुन्हा फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाची स्थिती १९ वर १ बाद अशी आहे.
काल दिवसअखेर ३२९-६ अश्या धावसंख्येनंतर भारत ४८६ धावांची मजल मारेल असे कोणालाच वाटले नव्हते. पण हार्दिक पंड्याने दणदणीत शतकी खेळी करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याने पुष्पकुमारच्या एका षटकात तब्ब्ल २६ धावा काढल्या.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला वेगवान भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीचा सामना करणे मुश्किल झाले. मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी २ बळी तर कुपलीप यादवने चमकदार कामगिरी करत ४ मोहरे टिपले. शतकवीर हार्दिक पांड्यानेही १ विकेट घेतली. श्रीलंकेकडून त्यांच्या कर्णधार दिनेश चंडिमलने सर्वाधिक म्हणजे ४६ धावा केल्या.
दुसऱ्या डावात श्रीलंकेची अपेक्षित कामगिरी झाली नाही. तिसऱ्या सत्रात भारतीय कर्णधार विराट कोहलीने फॉलो-ऑन देऊन श्रीलंकेला पुन्हा फलंदाजीला पाचारण केले. दिवसातील शेवटची १३ षटके असल्यामुळे दोनही सलामीवीर अतिशय लक्ष देऊन प्रत्येक चेंडूंचा सामना करत होते. करुणरत्ने ३९ धावांत १२ वर तर तरंगा ३० चेंडूत ७ धावांवर खेळत होते. शेवटचे १४ चेंडू बाकी असताना उमेश यादवने तरंगाला त्रिफळाचित केले.
सध्या भारताकडे ३३३ धावांची आघाडी असून लंकेच्या ९ विकेट घेऊन भारत उद्या परदेशातील मोठा कसोटी मालिका विजय साजरा करण्यासाठी उत्सुक आहे.