गोवा: दि. २९ डिसेबर: सांघिक कामगिरीत सातत्य राखताना एफसी गोवावर २-१ असा विजय मिळवत एटीके मोहन बागानने हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामात पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल चार संघांमध्ये धडक मारली. त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे.
फातोर्डा येथील पीजेएन स्टेडियमवर बुधवारी झालेल्या रंगतदार लढतीत पूर्वार्धातील आघाडीमुळे आत्मविश्वास उंचावणाऱ्या मोहन बागानने उत्तरार्धातही सातत्य राखले. मध्यंतरानंतर ११ मिनिटांनी म्हणजे ५६व्या मिनिटाला रॉय क्रिश्नाने क्लबला २-० असे आघाडीवर नेले. पिछाडीवर पडलेल्या गोवाने शेवटच्या २० मिनिटांत तीन बदल केले. रॉय क्रिश्नाच्या जागी डेव्हिड विल्यम्सला आणि मुहम्मद नॉगदांबा नाओरेमला मैदानात उतरवण्यात आले. याचा चांगला परिणाम पाहायला मिळाला. सामना संपायला ११ मिनिटे शिल्लक असताना जॉर्ज ऑर्टिझने अप्रतिम गोल करताना मोहन बागानची आघाडी २-१ अशी कमी केली. तब्बल ८० मिनिटे प्रतिस्पर्ध्यांना रोखणारा एटीकेचा गोलकीपर अमरिंदर सिंगला चकवण्यात ऑर्टिझला यश आले. शेवटच्या मिनिटांमध्ये एफसी गोव्याने बरोबरीसाठी प्रयत्न केले. मात्र, मोहन बागानचा बचाव सरस ठरला.
तत्पूर्वी, पहिल्या सत्रात दोन्ही संघांकडून चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी चुरस दिसली. उभय संघांनी गोल करण्याच्या संधीही निर्माण केल्या. गोव्याला दोन गोल करण्याची संधी होती. मात्र, २३व्या मिनिटाला दीपक तांगरीच्या पासवर लिस्टन कोलॅकोने एटीके मोहन बागानचे खाते उघडले. कोलॅकोने मारलेला फटका गोळीप्रमाणे गोलपोस्टमध्ये गेला. त्यापुढे प्रतिस्पर्धी गोलकीपरचे प्रयत्न निष्फळ ठरले. कोलॅकोच्या गोलप्रमाणेच एटीकेचा गोलकीपर अमरिंदर सिंगने एफसी गोवाचा बचाव हाणून पाडला. ३०व्या मिनिटाला जॉर्ज ऑर्टिझने लगावलेली फ्री कीक त्याने अप्रतिमपणे अडवली. अमरिंदर भिंत बनून उभा राहिल्याने गोव्याला बरोबरीपासून वंचित राहावे लागले.
बुधवारच्या विजयाने एटीके मोहन बागानचे ८ सामन्यांतून १४ गुण झाले असून पॉइंट्स टेबलमध्ये त्यांनी थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली. आता त्यांच्यापुढे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असलेले मुंबई सिटी एफसी (८ सामन्यांतून १६ गुण) आणि हैदराबाद एफसी (८ सामन्यांतून १५ गुण) आहेत. मोहन बागानचा यंदाच्या हंगामातील हा चौथा विजय आहे. आठव्या हंगामात सर्वाधिक विजय मिळवण्यात त्यांनी हैदराबादला गाठले आहे. ५ विजयांसह मुंबई सिटी अव्वल स्थानी आहे.
दुसरीकडे, एटीके मोहन बागानला रोखून अव्वल चार संघांच्या आसपास पोहोचण्याचे एफसी गोवाचे स्वप्न भंगले.सलग दोन बरोबरीनंतर पराभवाची चव चाखावी लागल्याने ते ८ सामन्यांतून तितक्याच गुणांसह आठव्या स्थानी आहेत.
निकाल : एटीके मोहन बागान २(लिस्टन कोलॅको-२३व्या मिनिटाला, रॉय क्रिश्ना-५६व्या मिनिटाला) विजयी वि. एफसी गोवा १ (जॉर्ज ऑर्टिझ-८१व्या मिनिटाला).