गोवा| हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) साखळी फेरीमध्ये मंगळवारी (८ फेब्रुवारी) अव्वल स्थानी असलेल्या हैदराबाद एफसीला रोखताना एटीके मोहन बागान आठव्या हंगामातील गुणतालिकेत पहिल्या चार संघांत स्थान मिळवण्यास उत्सुक आहे.
बाम्बोलिनच्या ऍथलेटिक्स स्टेडियममध्ये रंगणाऱ्या सामन्यात तुलनेत फॉर्मात असलेल्या हैदराबादचे पारडे जड आहे. सलग तीन विजय मिळवत त्यांनी १४ सामन्यांतून २६ गुणांची कमाई केली आहे. हैदराबादने सातत्य राखले तरी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या केरला ब्लास्टर्स एफसी आणि बंगलोर एफसीच्या पॉइंट्समध्ये (प्रत्येकी ३ गुण) केवळ एका गुणाचा फरक आहे. केरलाने (१३ सामने) मात्र, बंगलोरपेक्षा दोन सामने कमी खेळले आहेत.
हैदराबादच्या विजयी घोडदौडीमध्ये बार्थोमोलेव ऑग्बेचे याचा मोठा वाटा आहे. मागील सामन्यात एससी ईस्ट बंगालविरुद्ध (४-०) गोल हॅटट्रिक नोंदवणाऱ्या या स्टार खेळाडूने या हंगामातील १४ गोल करताना आयएसएलमधील एकूण गोलसंख्या ४९वर पोहोचवली आहे. सातत्य राखताना एटीके मोहन बागानविरुद्ध आयएसएलमधील गोलांची ‘पन्नाशी’ पूर्ण करावी, असे क्लब व्यवस्थापनासह चाहत्यांना वाटते.
आमच्याकडे ऑग्बेचेसह अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. मजबूत सेट-पीसेस उभारताना गोलसंधी निर्माण करताना सांघिक कामगिरी उंचावण्यात प्रत्येक जण मोलाचे योगदान देत आहे. एटीके मोहन बागान एक चांगला संघ आहे. मात्र, आम्ही सातत्य राखण्याचा प्रयत्न करू, असे हैदराबादचे प्रशिक्षक मार्केझ यांनी म्हटले आहे. हैदराबादने १४पैकी निम्मे सामने जिंकलेत. त्यात सलग तीन विजयांचा समावेश आहे. एटीकेला हरवल्यास यंदाच्या हंगामात सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावे होईल. आठव्या हंगामात हैदराबाद एफसीइतके (३३ गोल) गोल अन्य कुठलाही संघ मारू शकला नाही.
एटीके मोहन बागानचे आणखी काही सामने शिल्लक असले तरी अव्वल चार संघांत स्थान राखण्याच्यादृष्टीने त्यांना हैदराबादविरुद्ध विजयाची आवश्यकता आहे. हुआन फेरँडोच्या प्रशिक्षकपदाखालील क्लबने डझनभर सामने खेळताना २० गुण मिळवले आहेत. ताज्या क्रमवारीत ते सहाव्या स्थानी आहेत. मागील लढतीत गतविजेता मुंबई सिटी एफसीविरुद्ध (१-१) तीन गुण वसूल करण्याची मोहन बागानची संधी हुकली.
हैदराबाद एफसीने कमालीचे सातत्य राखले आहे. ऑग्बेचे हा चांगलाच फॉर्मात आहे. मात्र, आम्ही अमुक एका खेळाडूचा विचार करत नाही. मात्र, सांघिक कामगिरीसह त्यांच्या पाठिराख्यांना यशाचे क्रेडिट जाते. त्यामुळे मंगळवारचा सामना आमच्यासाठी तितका सोपा नसेल, असे मोहन बागानचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरँडो यांनी म्हटले आहे.
आठव्या हंगामातील पहिल्या सामन्यात उभय संघांमध्ये २-२ अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे परतीच्या लढतीत हैदराबाद आणि मोहन बागान एकमेकांवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करतील.
महत्त्वाच्या बातम्या –
ईस्ट बंगालचे उपांत्य फेरीतील आव्हान जवळपास संपुष्टात; ओदिशाने २-१ असा मिळवला विजय
ओ शेठ.. तुम्ही नादच केलाय थेट! रोनाल्डोने गाठला ४०० मिलियन इंस्टाग्राम फॉलोवर्सचा जादुई आकडा
ओदिशा एफसी विजयपथावर परतण्यासाठी सज्ज; एससी ईस्ट बंगालचा करणार सामना