गोवा: एटीके मोहन बागानला इंडियन सुपर लीगच्या ( आयएसएल) सलग दुसऱ्या पर्वात अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी अपेक्षांचा एव्हरेस्ट सर करावा लागणार आहे. हैदराबाद एफसीविरुद्धच्या सेमी फायनलच्या दुसऱ्या लेग (परतीच्या सामन्यात) लढतीत एटीके मोहन बागानला दोन गोल्सचा फरक भरून काढायचा आहे. हैदराबादने सेमी फायनलच्या पहिल्या लेगमध्ये ३-१ असा दणदणीत विजय मिळवून मोहन बागानला बॅकफूटवर फेकले आहे. या विजयाने हैदराबादने आयएसएलच्या फायनलमध्ये एक पाऊल टाकलेच आहे. आता त्यांना परतीच्या सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी करायची आहे.
मोहन बागानची सलग १५ सामन्यांतील अपराजित मालिका साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत जमशेपदूर एफसीने संपुष्टात आणली. त्यानंतर मोहन बागानला सेमी फायनलच्या पहिल्या लेगमध्ये हैदराबादकडून हार मानावी लागली. अँटोनियो हबास यांच्यानंतर ज्युआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बागानची स्वप्नवत वाटचाल सुरू होती, परंतु आता फेरांडो यांचे स्वप्न तुटण्याच्या मार्गावर आहे. ”फुटबॉलमध्ये सर्व काही शक्य असते. पुनरागमन करणे अवघड आहे, परंतु अशक्य नाही,”असा विश्वास फेरांडो यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले,”हैदराबादची रणनीती काय आहे, हे आम्ही पाहणार आहोत. त्याआधी आम्हाला स्वतःच्या रणनीतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे आणि गोल करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. हा सामना आमच्यासाठी सोपा नक्कीच नाही, परंतु त्यासाठी प्लान तयार करणे गरजेचे आहे. मानसिक कणखरता ही सर्वात महत्त्वाची आहे. आम्ही सर्वोत्तम कामगिरीचा प्रयत्न करणार आहोत. ”
रॉय कृष्णा हा मोहन बागानसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरलाय. आयएसएलच्या इतिहासात सेमी फायनल व फायनलमध्ये त्याने सर्वाधिक गोल सहाय्य केले आहेत. ”तो माझ्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो गोल करण्याची संधी निर्माण करतो आणि स्वतः त्याचं सोनंही करतो. हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे,”असे फेरांडो म्हणाले. मोहन बागानला टिरीशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे, पहिल्या लेगमध्ये त्याला दुखापत झाली होती.
दुसरीकडे हैदराबादचे पारडे जड आहे आणि त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून बचावफळी मजबूत ठेवल्यास त्यांना आयएसएल फायनलमध्ये प्रथमच प्रवेश करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. बार्थोलोमेव ऑग्बेचे हा त्यांचा स्टार खेळाडू ठरला आहे. त्याने या पर्वात सर्वाधिक १८ गोल्स केले आहेत. ”पहिल्या लेगच्या निकालावर मी आनंदी आहे. पहिल्या ३० मिनिटांत त्यांचा खेळ आमच्यापेक्षा सरस ठरला होता. पण, आम्ही दमदार पुनरागमन केले. त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत आणि ते सातत्याने कामगिरी उंचावत आहेत. आमच्याकडे दोन गोल्सचा लाभ असला तरी ही लढत सोपी नक्की नसेल. फायनलमध्ये प्रवेश करण्याची आम्हाला अधिक संधी आहे, परंतु हा मार्ग सोपा नाही,”असे हैदराबादचे प्रशिक्षक मार्को मार्क्यूझ म्हणाले.
ते पुढे म्हणाले,”आयएसएलच्या इतिहासात प्रथमच आम्ही उपांत्य फेरीत खेळतोय. आमच्याकडे अनुभवी व युवा खेळाडूंची उत्तम सांगड आहे. मोहन बागानचा संघ आव्हानात्मक आहे आणि त्यांच्याकडेही चांगले खेळाडू आहेत. आम्ही या सामन्यात विजय मिळवण्यासाठी उतरणार आहोत. फक्त बचावात्मक खेळ करायचे ठरवून मैदानावर उतरलो, तर ते आमच्यासाठी घातक ठरू शकते.”
सेमी फायनलच्या पहिल्या लेगमध्ये ऑग्बेचेने गोल करून आयएसएलच्या एका पर्वात सर्वाधिक १८ गोल करण्याच्या कोरो याच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्या नवा विक्रम बनवण्यासाठी केवळ एक गोल हवा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
केरला ब्लास्टर्सला फायनल प्रवेशाची संधी; जमशेदपूरची प्रतिष्ठा पणाला
क्या बात है! हैदराबाद एफसीचे एक पाऊल फायनलच्या उंबरठ्यावर; एटीके मोहन बागानवर दणदणीत विजय!
आयएसएल: शील्ड विजेत्या जमशेदपूरला केरलाने रोखले; समदचा एकमेव गोल निर्णायक