गोवा। हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात एटीके मोहन बागानने अंतिम फेरीत प्रवेश केला. मंगळवारी दुसऱ्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या लढतीत एटीकेएमबीने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचे कडवे आव्हान 2-1 असे परतावून लावले. पहिल्या टप्प्यातील 1-1 अशा बरोबरीनंतर या निर्णायक विजयासह एटीकेएमबीने 3-2 अशा ऍग्रीगेटवर बाजी मारली. नऊ मिनिटे बाकी असताना पोर्तुगालचा 28 वर्षीय स्ट्रायकर लुईस मॅचादो याने पेनल्टी दवडली. त्यामुळे नॉर्थईस्टला धक्का बसला. आता एटीके मोहन बागानची येत्या शनिवारी (दिनांक 13 मार्च) मुंबई सिटी एफसीविरुद्ध निर्णायक लढत होईल.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. मध्यंतरास एटीकेएमबीकडे 1-0 अशी आघाडी होती. आघाडी फळीतील ऑस्ट्रेलियाच्या 33 वर्षीय डेव्हिड विल्यम्स याने हा गोल केला. एटीकेएमबीचा दुसरा गोल दुसऱ्या सत्रात 68व्या मिनिटाला आघाडी फळीतील पंजाबचा 25 वर्षीय खेळाडू मानवीर सिंग याने केला. सहा मिनिटांनी नॉर्थईस्टची पिछाडी आघाडी फळीतील केरळचा 28 वर्षीय सुहैर वडाक्केपिडीका याने कमी केली.
भारतीय प्रशिक्षक खलिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थईस्टने झुंजार कामगिरी केली होती. पहिल्या लढतीत भरपाई वेळेत इद्रीसा स्यीला याने नॉर्थईस्टला बरोबरी साधून दिली होती. यावेळी मात्र अँटोनिओ लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखाली एटीकेएमबीने सातत्याने चाली रचत नॉर्थईस्टवर दडपण ठेवले.
खाते उघडण्याची शर्यत एटीकेएमबीने जिंकली. 38व्या मिनिटाला मध्यरक्षक लेनी रॉड्रीग्ज याने मध्य क्षेत्रातून चाल रचली. त्याने आघाडी फळीतील रॉय कृष्णाला पास दिला. कृष्णाने अप्रतिम पासवर विल्यम्स याच्या दिशेने चेंडू मारला. त्यावेळी विल्यम्सला रोखण्यात नॉर्थईस्टचा बचावपटू आशुतोष मेहता अपयशी ठरला. याचा फायदा घेत विल्यम्सने प्रतिस्पर्धी गोलरक्षक शुभाशिष रॉय याला चकवित गोल केला.
पुढे 68व्या मिनिटाला एटीकेएमबीने दुसरा गोल केला. कृष्णाचाच यात वाटा होता. त्याने उजवीकडून दिलेल्या पासनंतर मानवीरने दोन बचावपटूंना चकवून डाव्या पायाने शानदार फिनिशींग केले.
नॉर्थईस्टने सहा मिनिटांत खाते उघडत पिछाडी कमी केली. 74व्या मिनिटाला नॉर्थईस्टला कॉर्नर मिळाला. स्ट्रायकर लुईस मॅचादोने हा कॉर्नर घेताना गोलक्षेत्रात चेंडू मारला. त्यावर बदली बचावपटू बेंजामीन लॅम्बोट याने उंच उडी घेत हेडिंग केले. नेटच्या दिशेने आलेला चेंडू एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याला नीट अडविता आला नाही. गोलपोस्टला लागून पुढे उडालेल्या चेंडूवर सुहैरने हेडिंगवर लक्ष्य साधले. त्याने चेंडू नेटच्या उजव्या कोपऱ्यात मारला.
नऊ मिनिटे बाकी असताना एटीकेएमबीचा बचावपटू शुभाशिष बोस याने नॉर्थईस्टचा स्ट्रायकर इद्रीसा स्यीला याला पाठीमागून रोखले. त्यामुळे रेफरी राहुलकुमार गुप्ता यांनी नॉर्थईस्टला पेनल्टी बहाल केली. ती घेण्यासाठी स्ट्रायकर लुईस मॅचादो पुढे सरसावला, पण त्याने मारलेला फटका नेटवरून बाहेर गेला. मॅचादोने नेटच्या डाव्या कोपऱ्यात चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अरींदमचा अंदाज चुकला होता व त्याने उजवीकडे झेप टाकली होती, पण मॅचादोचा फटकाच चुकला.
एटीकेएमबीने आक्रमक सुरुवात केली. पहिल्याच मिनिटाला विल्यम्सने प्रयत्न केला, पण चेंडू क्रॉसबारवरून बाहेर गेला. तिसऱ्या मिनिटाला कृष्णाने मध्य क्षेत्रातून मध्यरक्षक जेव्हियर हर्नांडेझ याला पास दिला. हर्नांडेझने मारलेला चेंडू गोलपोस्टला थडकला.
सामन्यातील पहिला कॉर्नर चौथ्या मिनिटाला एटीकेएमबीने मिळविला. हर्नांडेझने गोलक्षेत्रात मारलेल्या चेंडूवर विल्यम्सने प्रयत्न केला, पण तो अचूकता साधू शकला नाही.
दहाव्या मिनिटाला विल्यम्सचा आणखी एक प्रयत्न उल्लेखनीय ठरला. 11व्या मिनिटाला विल्यम्सने सहकारी स्ट्रायकर मानवीर सिंगला पास दिला, पण मानवीरने मारलेला चेंडू नॉर्थईस्टला बचावपटू गुरजींदर कुमार याने रोखला आणि गोलरक्षक शुभाशिष याच्याकडे चेंडू वळविला.
पुढे 15व्या मिनिटाला कृष्णाने मुसंडी मारली. त्याचा जोरदार फटका शुभाशिषने रोखला.
नॉर्थईस्टकडून 21व्या मिनिटाला मध्यरक्षक फेडेरीको गॅलेगोने मध्य क्षेत्रातून आगेकूच केली. त्याने डावीकडे स्ट्रायकर लुईस मॅचादोला पास दिला, पण मॅचादो चेंडूवर नियंत्रण मिळवू शकला नाही.
तसेच 23व्या मिनिटाला नॉर्थईस्टचा स्ट्रायकर इद्रीसा स्यीला याने हेडिंगवर चेंडू डावीकडे मॅचादोच्या दिशेने मारला. मॅचादोने चेंडू नेटच्या दिशेने मारला, पण एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याने चेंडू थोपवित बाहेर घालविला.