गोवा २ फेब्रुवारी : हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गुरुवारी (३ फेब्रुवारी) सूर हरवलेल्या मुंबई सिटी एफसीविरुद्ध फॉर्मात असलेला एटीके मोहन बागान विजयी सातत्य राखण्यास उत्सुक आहे. या लढतीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एटीकेच्या कियान नासिरी हा केंद्रस्थानी असेल.
पीजेएन स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात सलग सात सामन्यात अपराजित मोहन बागानचे पारडे जड आहे. आयएसएलमध्ये गोल हॅटट्रिक करणारा सर्वात युवा फुटबॉलपटू असा मान मिळवणाऱ्या नासिरीवर त्यांची भिस्त आहे. मागील लढतीत (कोलकाता डर्बी) तळातील एससी ईस्ट बंगालवर मोहन बागानने ३-१ असा मोठा विजय मिळवला. त्यात नासिरी चमकला. गोल हॅटट्रिक करणारा सर्वात युवा फुटबॉलपटू ठरलेल्या नासिरीने बदली (सबस्टिट्यूट) म्हणून ही कामगिरी साकारली. हाही एक विक्रम आहे.
एटीके मोहन बागान हे आयएसएलच्या आठव्या हंगामातील गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत. त्यांच्या खात्यात ११ सामन्यांतून १९ गुण आहेत. मुंबई सिटीला हरवल्यास मोहन बागानला ‘टॉप फोर’मध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. मोहन बागानचे साखळीतील आणखी दोन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे तीन गुण मिळवल्यास अव्वल स्थानी असलेल्या हैदराबाद एफसी (१४ सामन्यांत २६ गुण) आणि त्यांच्यातील अंतर कमी करण्याला वाव मिळेल.
एटीके मोहन बागान अपराजित मालिका राखण्यास उत्सुक आहे. मात्र, आम्ही मागील कामगिरीवर जास्त अवलंबून नाही. फुटबॉल खेळात तसेच डावपेचांमध्ये सातत्याने बदल होत असतो. त्यामुळे प्रत्येक गेम वेगळा असतो, असे मोहन बागानचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरँडो यांनी म्हटले आहे.
पहिल्या टप्प्यात सुरेख कामगिरी करणाऱ्या गतविजेता मुंबई सिटी एफसीला सातत्य राखता आलेले नाही. मागील सहा सामन्यांत त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे गुणतालिकेत ते सहाव्या स्थानी फेकले आहेत. मुंबई सिटीच्या खात्यात आता १२ सामन्यातून १८ गुण आहेत. मागील लढतीत त्यांना तळातील नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीनेही १-१ असे बरोबरीत रोखले.
आठव्या हंगामातील पहिल्या टप्प्यात मुंबई सिटी एफसीने प्रतिस्पर्ध्यांचा ५-१ असा धुव्वा उडवला होता. दुसऱ्या सामन्यात मोहन बागानला रोखायचे असेल तर गतविजेत्यांना सर्व आघाड्यांवर खेळ उंचवावा लागेल. लीग अंतिम टप्प्यात असल्याने प्रत्येक क्लबची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुरुवारच्या लढतीत प्रतिस्पर्धी तुल्यबळ आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील विजय आमच्यासाठी जमेची बाजू आहे. तरीही मागील निकाल विसरून सर्वोत्तम खेळाला आमचा प्रयत्न राहील, असे मुंबई सिटीचे प्रशिक्षक डेस बंकिमहॅम यांनी म्हटले आहे.