कोलकाता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) दोन वेळा विजेतेपद मिळविलेल्या एटीकेने चौथ्या मोसमात फॉर्म गवसताच टॉप गिअर टाकण्यास सुरवात केली आहे. मार्की खेळाडू रॉबी किन याच्या सदाबहार गोलच्या जोरावर एटीकेने दिल्ली डायनॅमोजला 1-0 असे हरविले. उत्तरार्धात किनने नेत्रदिपक गोल आणि मग नेत्रसुखद जल्लोष केला.
सुरवातीपासून अथक चाली रचणाऱ्या एटीकेच्या प्रयत्नांना 12 मिनिटे कमी असताना यश आले. बिपीन सिंगने हेडींग केलेला चेंडू किनच्या दिशेने आला. या चेंडूवर नियंत्रण मिळविणे कठिण होते, पण किनने आपले तमाम कौशल्य आणि अनुभव पणास लावला.
शारिरीक संतुलन साधत त्याने चेंडू नेटमध्ये मारला. त्यानंतर कोलांटउड्या घेत त्याने खास शैलीत जल्लोष केला. मग उभे राहून त्याने प्रेक्षकांना नमस्कार करीत भावपूर्ण अभिवादन केले. त्यावेळी प्रेक्षकांत उपस्थित असलेला माजी क्रिकेट कर्णधार सौरभ गांगुली याच्यासह सर्वांनी त्याला दाद दिली.
एटीकेचा हा सलग दुसरा विजय आहे. टेडी शेरींगहॅम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या संघाने दोन विजय, दोन बरोबरी व दोन पराभव अशी कामगिरी केली. या संघाने आठ गुणांसह सातवा क्रमांक गाठला. त्यांनी एक क्रमांक प्रगती केली.
केरळा ब्लास्टर्स सात गुणांसह आठव्या स्थानावर आहे. दिल्लीचे तळातील स्थान कायम राहिले. दिल्लीला सलग पाचवा पराभव पत्करावा लागला. सलामीला मिळालेल्या विजयासह तीन गुण मिळविल्यानंतर त्यांना भर घालता आलेली नाही. त्यांचा गोलफरक उणे 10 आहे.
तत्पूर्वी, पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत सुटला. पाचव्या मिनिटाला रॉबी किनने चाल रचली. त्याने डावीकडून आगेकूच करीत नेटसमोर असलेल्या जयेश राणेला पास दिला. जयेशने हेडींग केले, पण चेंडू थोडक्यात बाहेर गेला. सातव्या मिनिटाला एटीकेला कॉर्नर मिळाला.
त्यावर रायन टेलरने चांगली किक मारली, पण दिल्लीच्या रॉइल्सन रॉड्रीग्जने हेडींग करून चेंडू दूर घालविला. एटीकेने वेगवान खेळ सुरु केल्यामुळे दिल्लीने चेंडूवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला. 12व्या मिनिटाला एटीकेच्या प्रबीर दासने आगेकूच केली होती.
त्याने तिरकस मारलेला चेंडू दिल्लीच्या प्रतिक चौधरी याच्या दंडाला लागला, पण पंचांना हे दिसले नसावे. त्यामुळे एटीकेची संभाव्य पेनल्टी हुकल्याची खंत स्थानिक प्रेक्षकांना वाटली.
16व्या मिनिटाला दिल्लीच्या रोमीओ फर्नांडीसने घोडदौड केली होती. त्याने मारलेला चेंडू एटीकेच्या बचावपटूला लागून बाहेर गेला. त्यामुळे दिल्लीला कॉर्नर मिळाला. प्रीतम कोटलने त्यावर हेडींग केले, पण एटीकेचा गोलरक्षक देबजीत मुजुमदार याने झेप टाकत हाताने चेंडू नेटवरून घालविला.
40व्या मिनिटाला एटीकेला सर्वोत्तम संधी मिळाली होती. कॉनर थॉमसने रचलेल्या चालीवर रॉबी किनने झिक्यूइन्हाला पास दिला. झिक्यूइन्हाने बॉक्समध्ये धाव घेत चेंडू मारला, पण तो अचूकता साधू शकला नाही.