ला लीगाच्या २६ व्या आठवड्यात काही उलटफेर तर झालेच पण त्यामुळे बार्सेलोनाच्या विजेतेपदाच्या दावेदारीला एक आव्हान निर्माण झाले आहे. बार्सेलोना आणि मॅड्रिडमधील स्पर्धा फुटबाॅल प्रेक्षाकांसाठी काही नवीन नाही पण या मौसमात खेळात सातत्य नसल्याने रियल मॅड्रिड विजेतेपदाच्या शर्यतीतून जवळजवळ बाद झाली आहे. अश्या वेळी बार्सेलोनाला आव्हान देतोय तो मॅड्रिडचाच संघ ॲटलेटिको डी मॅड्रिड.
या आठवड्याच्या सामन्यांची सुरुवात झाली ती इस्पानयोल विरुद्ध रियल मॅड्रिड सामन्याने. रोनाल्डो शिवाय मैदानात उतरलेल्या मॅड्रिडने बेनिझेमाला सुद्धा राखीव मध्ये ठेवत सगळ्यांना धक्का दिला. बेले, इस्को, ॲसेन्सियोला घेऊन उतरायचा निर्णय रियलचा मॅनेजर झिदानेच्या चांगलाच गळ्यात आला. पहिला हाफ दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.
दूसऱ्या हाफला इस्कोचा बदली खेळाडू म्हणून बेन्झेमाला पाठवण्यात आले पण मॅड्रिडला गोल करण्यात यश मिळाले नाही. सामना संपायला शेवटचा १ मिनिट असताना मोरेनोने आलेल्या क्राॅसवर गोल करत सर्वांना धक्का दिला. या गोल बरोबरच रियल मॅड्रिडला या मौसमात अजून एका पराभवाला सामोरे जावे लागले.
दूसरीकडे विजेतेपदासाठी बार्सेलोनाला आव्हान देणाऱ्या ॲटलेटिको डी मॅड्रिडने लिगानेसला ४-० ने हरवले. ॲटलेटिको तर्फे सर्व गोल्स ग्रिझमानने केले. २ सामन्यात २ हॅट्रिक करत ग्रिझमानने ७ गोल्स केले आहेत. या विजयासह ॲटलेटिको डी मॅड्रिड गुणतालीकेत २६ सामन्यात ६१ गुणांसह दूसर्या क्रमांकावर आहेत.
तर ला लीगाच्या अग्रस्थानी असलेल्या बार्सेलोनाला परवा १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले. लास पाल्मस बरोबरच्या लढतीत मेस्सीने फ्री कीकवर गोल करत बार्सेलोनाला १-० ची पढत मिळवून दिली पण ४८ व्या मिनिटला मिळालेल्या पेनल्टीच्या जोरावर लास पाल्मसने १-१ ची बरोबरी केली. सामन्याच्या अखेरपर्यंत हाच स्कोर राहिला आणि बार्सेलोनाला १ गुणावर समाधान मानावे लागले.
बार्सेलोना आणि ॲटलेटिको डी मॅड्रिडमध्ये केवळ ५ गुणांचा फरक आहे. पुढील सामना रविवारी बार्सेलोना विरुद्ध ॲटलेटिको डी मॅड्रिड आहे. ॲटलेटिको हा सामना जिंकून बार्सेलोनाच्या जवळ जायचा प्रयत्न करेल तर बार्सेलोनाचा हा सामना जिंकून विजेतेपदाची दावेदारी अधिक मजबूत करायचा प्रयत्न करेल.
ग्रिझमानच्या ट्रांस्फर बद्दल:-
ग्रिझमानच्या बार्सेलोनाकडे जाण्याच्या बातम्या अलिकडेच जोरवर आहेत तर काही स्पेनच्या वृत्तपत्रांनीतर ही ट्रांस्फर निश्चित झाली असून या समर ट्रांस्फरला औरचारिकता पूर्ण होईल. त्यात ग्रिझमान १०० मिलियन युरो मध्ये बार्सेलोनाकडे जाणार असल्याचे म्हटले आहे.