पुणे: गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर अॅटॉस संघाने पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आयरिसर्च संघावर ७१ धावांनी सहज मात केली. अॅटॉस संघाने दिलेल्या १४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिसर्चचा डाव ७४ धावांत संपुष्टात आला.
पिंपरी-चिंचवड येथील पीसीएमसी व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीच्या मैदानावर ही लढत झाली. अॅटॉस संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १४५ धावा केल्या. अॅटॉसची सुरुवात चांगली झाली नव्हती. मात्र, मधल्या फळीतीली फलंदाजांनी अॅटॉसचा डाव सावरला. यात हर्षद तिडकेने ४१ चेंडूंत ८ चौकारासह ४३ धावा केल्या. त्याला वैभव पेंडणेकर आणि महेश भोसलेची चांगली साथ मिळाली.
वैभवने २० चेंडूंत ४ चौकार व १ षटकारसह २७, तर महेश भोसलेने २४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३६ धावा केल्या. यानंतर अॅटॉसच्या गोलंदाजांसमोर आयरिसर्चच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही आणि आयरिसर्चचा डाव १४.५ षटकांत ७४ धावांतच संपुष्टात आला. आयरिसर्चच्या केवळ एकालाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यांचा निम्मा संघ ४० धावांतच माघारी परतला होता. हर्षद तिडकेने फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही चमक दाखवून तीन गडी बाद केले.
बार्कलेजचा विजय
दुसऱ्या लढतीत बार्कलेज संघाने स्प्रिंगर नेचर संघावर सात गडी राखून मात केली. स्प्रिंगर नेचर संघाचा डाव १८.१ षटकांत १३१ धावांत संपुष्टात आला. यानंतर बार्कलेज संघाने विजयी लक्ष्य दत्तात्रय रौतीच्या अर्धशतकाच्या जोरावर १६.३ षटकांत ३ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक : १) अॅटॉस – २० षटकांत ५ बाद १४५ (हर्षद तिडके ४३, महेश भोसले नाबाद ३६, वैभव पेंडणेकर २७, चिन्मय माळवणकर १८, ऋषीकेश साळुंके २-२०, अशोक अय्यर १-१७, प्रशांत चव्हाण १-२०, अभिषेकसिंग १-१९) वि. वि. आयरिसर्च – १४.५ षटकांत सर्व बाद ७४ (संजय खेर २०, हर्षद तिडके ३-८, मंगेश सांगोडकर २-१२, रुपेश खिराड २-१४, ईशान नारंग २-१८).
२) स्प्रिंगर नेचर – १८.१ षटकांत सर्व बाद १३१ (पीयूष पाटील ३४, अविनाश आंबळे ३२, प्रमोद मोडक २५, शिवाजी अंकापल्ली ४-२४, कनिष्कसिंग २-१५, सागर अगरवाल २-२४, अनुप पेरा १-८) पराभूत वि. बार्कलेज – १६.३ षटकांत ३ बाद १३५ (दत्तात्रय रौती ५८, सागर अगरवाल नाबाद ३२, राजीव शेखर २-२३, अविनाश आंबळे १-१५).