औरंगाबाद । ऐतिहासिक ओळख असणाऱ्या औरंगाबाद शहरात पहिल्यांदाच ज्युनीर राष्ट्रीय हॉकी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या नवव्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचा आरंभ रविवारी (17 फेब्रुवारी) होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना हा 28 फेब्रुवारी होणार आहे.
प्रत्येकी बारा जणांचा समावेश असलेले देशभरातील 20 हॉकी संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात असलेल्या भारतीय खेळ प्राधिकरण (साई) च्या नव्या कोऱ्या टर्फ मैदानावर ही स्पर्धा खेळणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भासाठीही या पहिल्या वहिल्या राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन ही अभिमानाचीच बाब आहे.
आयोजन समितीचे अध्यक्ष ऍड. रमेश जोगदंड यांनी सांगितले की, “पर्यटकांसाठी कायमच आकर्षण राहिलेल्या औरंगाबाद शहरात ज्युनीयर राष्ट्रीय हॉकी स्पर्धांचे आयोजन ही अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेची चोख तयारी करण्यात आली असुन खेळाडूंनाही ही स्पर्धा सुंदर आयोजनासाठी लक्षात राहणार आहे’. अजिंठा क्रीडा मंडळाचेही अध्यक्ष असलेले श्री. जोगदंड पुढे म्हणाले की, “एकेकाळी देशाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असलेल्या अजिंठा गोल्ड कप या स्पर्धा औरंगाबादेत होत असत. आता या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या माध्यमातुन औरंगाबाद आणि मराठवाड्यातील हॉकीचे पुनरुज्जीवन करण्याचे आमचे ध्येय आहे.’
हॉकी महाराष्ट्र आणि औरंगाबाद जिल्हा हॉकी संघटनेतर्फे आयोजित या स्पर्धेतील सामने साखळी आणि बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत. नियमांना अनुसरुन 20 संघांचे पाच गट या स्पर्धेत करण्यात येणार असुन, 17 ते 23 फेब्रुवारीदरम्यान साखळी सामने होणार आहेत. प्रत्येका गटातील दोन संघ उपांत्यपुर्व फेरी खेळतील. यांच्यातील विजेते उपांत्य आणि अंतिम फेरीत विजेतेपदासाठी खेळणार आहेत. एका दिवसाला या स्पर्धेत सात सामने खेळवण्यात येणार असुन ऍस्ट्रोटर्फ मैदानावर दररोज सकाळी सातला या सामन्यांना सुरुवात केली जाणार आहे. 48 सामन्यांच्या या स्पर्धेत दोन दिवसांची विश्रांतीही संघांना दिली जाणार आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे म्हणाले की, “राष्ट्रीय ज्युनीयर हॉकी स्पर्धा खेळवण्याचा विषय चर्चेला आल्यावर औरंगाबादने ही स्पर्धा खेळवण्यासाठी रस दाखवला. हॉकीचा प्रसार राज्याच्या अन्य जिल्ह्यांमध्येही व्हावा यासाठी हॉकी महाराष्ट्रकडुन आनंदाने याला होकार देण्यात आला. राज्यात हॉकी महाराष्ट्रने अत्तापर्यंत सहा राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय हॉकी स्पर्धांच्या आयोजनामध्ये आता औरंगाबाद हे नवे नाव जोडले गेले आहे’. ते पुढे म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातुन उदयोन्मुख खेळाडूंना आपले कसब दाखवण्याची संधी मिळते आणि हॉकी महाराष्ट्रचे अशा मुलांना संधी देण्याचे कायमच ध्येय राहिले आहे. या स्पर्धा खेळवण्यासाठी औरंगाबादने दिलेल्या पाठींब्यासाठी आम्ही आभारी आहोत.
औरंगाबाद हॉकी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी सांगितले की, “हॉकीचे चांगले सामने औरंगाबादकरांना पहायला मिळतील. हे सामने शाळकरी मुलांना पाहता यावे यासाठी संघटनेशी संलग्न असलेल्या शाळांना स्पर्धेचे आमंत्रण देण्यात येणार आहे. सर्वांना या खेळाचा आनंद घेता यावा यासाठी टप्प्या टप्प्याने शाळा “साई’तील आंतरराष्ट्रीय मैदानावर येतील यासाठी नियोजन करण्यात आले आहे’.
हॉकी महाराष्ट्रने पद्मश्री आणि ऑलिम्पियन हॉकीपटू धनराज पिल्ले यांना यांना या स्पर्धेचे ब्रॅण्ड ऍम्बेसडर म्हणुन घोति केले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाला भारत सरकारचे क्रीडा सचिव राहुल भटनागर यांच्यासह श्री. पिल्ले उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचा पहिला सामना चारवेळा विजेता राहिलेल्या हॉकी पंजाब आणि तामिळनाडूच्या हॉकीच्या संघांदरम्यान होणार आहे. या सामन्याला रविवारी (17 फेब्रुवारी) सकाळी सातला सुरुवात होणार आहे. रविवारी (17 फेब्रुवारी) सकाळी नऊ वाजता उद्धाटन सोहळा होणार आहे.