न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकापैकी एक मानला जातो. शनिवारी (9 मार्च) क्राइस्टचर्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. ग्लेन फिलिप्सनं या सामन्यात एक अविश्वसनीय झेल घेतला. फिलिप्सच्या या झेलचं आता जगभरातून कौतुक होत आहे. फिलिप्सनं उजवीकडे हवेत झेप घेत एका हातानं झेल घेतला, जे पाहून सर्वच थक्क झाले.
न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदी डावातील 61वं षटक टाकत होता. त्यानं ओव्हरचा दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, ज्यावर मार्नस लॅबुशेननं कट शॉट मारला. एवढ्यात तेथे उपस्थित असलेल्या ग्लेन फिलिप्सनं उजवीकडे हवेत झेप घेत एका हातानं अप्रतिम झेल घेतला. या कॅचचा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
SUPERMAN! 🦸 What a catch from Glenn Phillips! Australia are 221/8 at lunch on Day 2 🏏@BLACKCAPS v Australia: 2nd Test | LIVE on DUKE and TVNZ+ pic.twitter.com/Swx84jNFZb
— TVNZ+ (@TVNZ) March 9, 2024
झेल घेतल्यानंतर ग्लेन फिलिप्स खूपच उत्साही दिसला. संघातील इतर सदस्यांनीही ही विकेट उत्साहात साजरी केली. मार्नस लॅबुशेनचं शतक 10 धावांनी हुकलं. तो 147 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीनं 90 धावा करून बाद झाला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रोमांचक टप्प्यात पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावाच्या 162 धावांना उत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 256 धावांवर आटोपला. यामध्ये प्रमुख भूमिका किवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं बजावली. त्यानं 23 षटकांच्या स्पेलमध्ये 4 मेडन्ससह 67 धावांत 7 बळी घेतले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 94 धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मिचेल स्टार्कनं सलामीवीर विल यंगला (1) यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीकडे झेलबाद केले. मात्र येथून यजमान संघानं दमदार पुनरागमन केलं. टॉम लॅथम (65*) आणि केन विल्यमसन (51) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची शतकी भागीदारी केली. पॅट कमिन्सनं विल्यमसनला बाद करत किवी संघाला दुसरा धक्का दिला.
दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडनं 50 षटकांत दोन गडी गमावून 134 धावा केल्या. रचिन रवींद्र (11*) लॅथमसह क्रीजवर आहे. यजमान संघानं ऑस्ट्रेलियावर 40 धावांची आघाडी घेतली असून 8 विकेट शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
इतर बातम्या-
ऐतिहासिक! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ 147 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त
Video: शुभमन नव्हे, हा तर ‘सुपरमॅन’! चित्त्यासारखं मागे धावत जाऊन घेतला बेन डकेटचा शानदार झेल
शेरास सव्वाशेर! इंग्लंडच्या ‘बेझबॉल’ला यशस्वीच्या ‘जॅसबॉल’ने उत्तर