दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (दि. 15 सप्टेंबर) सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने स्टार फलंदाज हेन्रीच क्लासेन आणि डेविड मिलर यांच्या विस्फोटक फटकेबाजीच्या जोरावर वनडेतील अव्वल संघ ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा पुरता घाम काढत सामना खिशात घातला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 164 धावांनी विजय झाला. विशेष म्हणजे, या विजयासह संघाने एक भीमपराक्रम आपल्या नावावर केला. काय आहे तो विक्रम? चला जाणून घेऊयात…
दक्षिण आफ्रिकेचा विक्रम
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी टेम्बा बावुमा (Temba Bavuma) याच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिका संघाने हेन्रीच क्लासेन (Heinrich Klaasen) आणि डेविड मिलर (David Miller) यांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकात 5 विकेट्स गमावत 416 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. या सामन्यात क्लासेनने शतकी खेळी साकारली. हे त्याचे वनडे कारकीर्दीतील तिसरे शतक होते. त्याच्या या शतकामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोठी मदत झाली. या धावसंख्येसह संघाने एक खास विक्रमही केला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने वनडेच्या कोणत्याही सामन्यातील अखेरच्या 10 षटकात सर्वाधिक धावा करण्याचा महाविक्रम बनवला. यामुळे बलाढ्य इंग्लंड संघाचाही विक्रम मोडीत काढला गेला. याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेने वनडेत 400 किंवा त्याहून अधिक धावसंख्या करण्याची ही 7वी वेळ होती. यामुळे भारतही मागे पडला. भारताने वनडेत 6 वेळा अशी कामगिरी केली होती.
दक्षिण आफ्रिकेने मोडले इंग्लंडचा विक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या 10 षटकात 173 धावांचा पाऊस पाडला. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही सामन्यात अखेरच्या 10 षटकात यापूर्वी एवढ्या धावा कधीच बनल्या नव्हत्या. यापूर्वी वनडे सामन्याच्या अखेरच्या 10 षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंड संघाच्या नावावर होता. इंग्लंडने 2022मध्ये नेदरलँडविरुद्ध अखेरच्या 10 षटकात 164 धावा केल्या होत्या. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला मागे टाकत वनडे सामन्याच्या अखेरच्या 10 षटकात सर्वाधिक 173 धावा करण्याचा मान मिळवला आहे.
एका वनडे सामन्यात अखेरच्या 10 षटकात सर्वाधिक धावा करणारे संघ
173 धावा- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, 2023
164 धावा- इंग्लैंड विरुद्ध नेदरलँड, 2022
163 धावा- दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, 2015
154 धावा- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, 2009
153 धावा- न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज, 2015
क्लासेन आणि मिलरची 222 धावांची झंझावाती भागीदारी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात हेन्रीच क्लासेन याने 57 चेंडूत शानदार शतक झळकावले. याव्यतिरिक्त त्याने सामन्यात 83 चेंडूत 13 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने 174 धावांची अविस्मरणीय खेळी साकारली. ही त्याची वनडे कारकीर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. तसेच, डेविड मिलर याने 45 चेंडूत 5 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या. या दोघांनी सामन्यात पाचव्या विकेटसाठी 94 चेंडूत 222 धावांची जबरदस्त भागीदारी रचली. तसेच, मिलरने वनडे क्रिकेटमधील आपल्या 4000 धावांचा टप्पाही पार केला. (aus vs sa south africa hit most runs in last 10 overs in odi heinrich klaasen and david miller class knock)
हेही वाचा-
शून्यावर बाद होणारा कर्णधार रोहित पराभवानंतर स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘बांगलादेशच्या गोलंदाजांना…’
आशिया चषक इतिहासातील टॉप 5 गोलंदाज! श्रीलंकनचा दबदबा, तर यादीत एकच भारतीय