---Advertisement---

‘ऑलिम्पिकमध्येही गोल्ड जिंकण्यासाठी फक्त एकच शर्यत असते’, रोहितच्या ‘त्या’ विधानावर कमिन्सचे मोठे भाष्य

Pat-Cummins-And-Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हातून 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी तीन सामन्यांची मालिका खेळण्याचा सल्ला दिला होता. तो म्हणालेला की, दोन वर्षे कठोर मेहनतीनंतर संघ अंतिम सामन्यात पोहोचतो, अंतिम सामन्यात तीन सामन्यांची मालिका असती, तर चांगलं झालं असतं. मात्र, आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने रोहितच्या या विधानावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला पॅट कमिन्स?
अंतिम सामन्यात तीन सामने खेळण्याच्या रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या विधानावर पॅट कमिन्स (Pat Cummins) याने भाष्य केले. तो म्हणाला की, “मी आयसीसीच्या या प्रकाराने खुश आहे. तुम्ही 50 सामन्यांची मालिका खेळा, पण ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठीही एकच शर्यत असते आणि हाच खेळ आहे.”

रोहित शर्माचे विधान
रोहित शर्मा याने सामन्यानंतर म्हटले होते की, “मी देखील अंतिम सामन्यात तीन सामन्यांची मालिका खेळण्याच्या बाजूने आहे, पण त्यासाठी वेळ आहे का? अशाप्रकारच्या मोठ्या सामन्यासाठी दोन्ही संघांना योग्य वेळ मिळाला पाहिजे. मला वाटते, तीन सामन्यांची मालिका चांगली राहील, पण त्यासाठी वेळ शोधावा लागेल. दोन वर्षांच्या मेहनतीनंतर तुम्हाला फक्त एकच संधी मिळते. कसोटी क्रिकेटची लय अचानक मिळवली जाऊ शकत नाही. पुढील सायकलमध्ये जर शक्य असेल, तर तीन सामन्यांच्या मालिकेचा अंतिम सामना असायला पाहिजे.”

पुढे बोलताना तो असेही म्हणाला होता की, “अशाप्रकारच्या मोठ्या स्पर्धांच्या तयारीसाठी 20-25 दिवसांचा वेळ मिळाला पाहिजे.” याव्यतिरिक्त त्याने एका प्रश्नाचे उत्तर देत असेही म्हटले की, “जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी जूनच का? हा सामना फेब्रुवारी-मार्चमध्येही आयोजित होऊ शकतो. इंग्लंडव्यतिरिक्त इतर देशातही आयोजित केला जाऊ शकतो.”

सामन्यानंतर रोहित म्हणाला की, “आम्ही पहिल्या दिवशी नाणेफेक गमावल्यानंतर चांगली सुरुवात केली होती. आम्ही पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली. मात्र, त्यानंतर आम्ही चांगली गोलंदाजी करू शकलो नाही. याचे सर्व श्रेय ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जाते. ट्रेविस हेडने कमालीची फलंदाजी केली, तिथूनच आमच्या हातून सामना निसटण्यास सुरुवात झाली होती. आम्हाला समजले होते की, आता इथून पुनरागमन करणे कठीण आहे.”

भारतीय संघ 234 धावांवरच सर्वबाद
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात भारतीय संघापुढे 444 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारतीय संघ दुसऱ्या डावात 234 धावांवरच संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 209 धावांनी आपल्या नावावर केला. दुसऱ्या डावात भारताकडून विराट कोहली (49), अजिंक्य रहाणे (46) आणि रोहित शर्मा (43) यांनी 40हून अधिक धावांचे योगदान दिले. इतर एकही फलंदाज खास खेळी करू शकला नाही. (aussie skipper pat cummins reply rohit sharma on best of three finals in world test championship)

महत्वाच्या बातम्या-
सचिनने केले टीम इंडियाच्या पराभवाचे विश्लेषण; म्हणाला, ‘त्याला बाहेर केल्याने…’
‘आम्ही पहिल्याच दिवशी हारलो…’, BCCI अध्यक्षांनी सांगितले भारताच्या पराभवामागील सर्वात मोठे कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---