भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव झाला. तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचं लक्ष्य दिलं होतं. कांगारुंनी हे लक्ष्य 4 गडी गमावून सहज गाठलं.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे गोलंदाजीसाठी आला नाही. त्याचा फटका भारतीय संघाला बसला. नवख्या प्रसिद्ध कृष्णाने 3 बळी घेतले. तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली. सिडनीची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल होती. परंतु भारतीय फलंदाजांनी स्कोर बोर्डवर पुरेशा धावा लावल्या नसल्यामुळे ऑस्ट्रेलियानं विजयी लक्ष्य सहज गाठलं.
या विजयासह कांगारू संघानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्येही प्रवेश केला. आता WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. WTC च्या सध्याच्या सायकलचा अंतिम सामना पुढील वर्षी 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघ सलग दोन फायनल खेळला, जिथे टीम इंडियाचा प्रथम न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. आता तिसऱ्यांदा WTC फायनलमध्ये पोहोचण्याचं भारतीय संघाचं स्वप्न भंगलं आहे.
ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावात सलामीवीर उस्मान ख्वाजनं सर्वाधिक 41 धावा केल्या. याशिवाय ट्रॅव्हिस हेडने (34*) आणि ब्यू वेबस्टरनं (39*) धावांचं योगदान दिलं. या दोघांमध्ये नाबाद अर्धशतकी भागिदारी झाली. भारतीय संघाचा दुसरा डाव 157 धावांवरच आटोपला. या सामन्यात भारतीय संघानं पहिल्या डावात 185 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डावही 181 धावांवर आटोपला. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे भारताला चार धावांची आघाडी मिळाली होती.
टीम इंडियानं पर्थमधील पहिला कसोटी सामना 295 धावांनी जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं ॲडलेड कसोटी 10 गडी राखून जिंकली. यानंतर ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिली. मेलबर्न येथे खेळली गेलेली बॉक्सिंग डे कसोटी ऑस्ट्रेलियानं 184 धावांनी जिंकत मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे राखण्यासाठी टीम इंडियाला सिडनी येथील अखेरच्या कसोटीत विजय मिळवणे आवश्यक होतं. परंतु तसं होऊ शकलं नाही. ऑस्ट्रेलियानं सिडनी कसोटी जिंकून मालिका 3-1 ने खिशात घातली.
हेही वाचा –
तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी गुलाबी जर्सी का घातली? जाणून घ्या सिडनी ‘पिंक’ कसोटीचा इतिहास
विराटने मैदानावर केली ऑस्ट्रेलियन चाहत्यांची बोलती बंद, सँडपेपर घटना पुन्हा चर्चेत; VIDEO पाहा
IND vs AUS; “रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाला हादरून सोडले” महान खेळाडूने केले कौतुक