---Advertisement---

ऑस्ट्रेलियाची पुन्हा सरशी! हॉकी फायनलमध्ये भारताचा ७-० ने दारूण पराभव

On: सोमवार, ऑगस्ट 8, 2022 7:06 PM
---Advertisement---

बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अखेरच्या दिवशी भारताला पुरुष हॉकी संघाकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र, ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचे आपले वर्चस्व हॉकीतही कायम राखत ७-० असा दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाचे हॉकीत राष्ट्रकुल सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. ऑस्ट्रेलियन हॉकी संघाने सलग सातव्या वेळी हॉकीचे सुवर्णपदक आपल्या नावे केले.

सन १९९८ मध्ये प्रथमच हॉकीचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून ऑस्ट्रेलियाने पुरुष‌ हॉकीमध्ये सातत्याने सुवर्णपदके जिंकले आहे. भारतीय संघाने यावेळी ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोखण्याचा निर्धार केला होता. साखळी फेरीपासून उपांत्य फेरीपर्यंत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. परंतु, त्यांना पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचे आव्हान पार करता आले नाही. अशाप्रकारे भारताला तिसऱ्यांदा अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

स्पर्धेत आत्तापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या भारतीय संघाचा बचाव या सामन्यात सपशेल अपयशी ठरला. तसेच आक्रमणाची धारही चांगलीच बोथट झालेली दिसली. ६० मिनिटांच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या गोलपोस्टवर फारसे आक्रमण केले नाही. ऑस्ट्रेलियाचा भक्कम बचाव भेदण्यात भारतीय संघ पूर्णपणे अपयशी ठरला. संपूर्ण सामन्यात भारताला एकही पेनल्टी कॉर्नर मिळाला नाही, यावरूनच भारतीय आक्रमकांचे अपयश दिसून येईल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने सात गोल करत भारताचा बचावही उघडा पाडला. ऑस्ट्रेलियाने जबरदस्त मूव्ह आणि काउंटर अटॅकसह सर्व गोल केले. अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेशने अनेक हल्ले हाणून पाडले. तरीही, ऑस्ट्रेलियाने ८ वेळा चेंडू भारताच्या गोल पोस्टमध्ये टाकण्यात यश मिळवले. परंतु, यातील अखेरचा गोल रेफ्रीने फेटाळला.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---