2021 चा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 साठी पात्र ठरला आहे. कांगारुंनी विश्वचषकाच्या 24व्या सामन्यात नामिबियाचा 9 गडी राखून पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना नामिबियानं 17 षटकांत सर्वबाद अवघ्या 72 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियानं 73 धावांचं लक्ष्य 5.4 षटकांत फक्त एक गडी गमावून गाठलं. ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांनी तुफानी फलंदाजी केली. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा पॉवरप्ले मधील हा सर्वाधिक स्कोर आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो अत्यंत योग्य ठरला. फलंदाजी करताना नामिबियाची टीम कधी सामन्यात दिसलीच नाही. नामिबियाचा अर्धा संघ 21 धावांवर तंबूत गेला होता. संघासाठी कर्णधार ग्रेहार्ड इरॅस्मस यानं सर्वाधिक धावा केल्या. तो 43 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 36 धावा करून बाद झाला. त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू झम्पानं शानदार गोलंदाजी केली. त्यानं आपल्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 12 धावा देऊन 4 बळी घेतले.
धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला कोणताही त्रास झाला नाही. कांगारुंनी पॉवरप्ले मध्येच 73 धावांचं लक्ष्य गाठलं. सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नरनं 8 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 20 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडनं 17 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 34 धावांची खेळी खेळली. कर्णधार मिचेल मार्शनं 9 चेंडूत 18 धावा ठोकल्या.
‘ब’ गटात ऑस्ट्रेलियाचा हा तीन सामन्यांतील सलग तिसरा विजय आहे. यासह ते सुपर 8 साठी पात्र ठरले, तर नामिबियाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.
महत्त्वाच्या बातम्या –
यांच्यासाठी वय हा फक्त आकडा! टी20 विश्वचषकातील 4 सर्वात वयस्कर खेळाडू, ज्यांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे
या 3 मोठ्या संघांवर विश्वचषकातून बाहेर पडण्याचा धोका! अमेरिका अन् अफगाणिस्तान सुपर-8 मध्ये जातील का?
बांग्लादेशच्या खेळाडूचे पंचांवर गंभीर आरोप, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सुरू झाला नवा वाद