ऑस्ट्रेलियाला 2023 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. ते पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत संघासोबत राहतील. बुधवारी, (30 ऑक्टोबर) क्रिकेट ऑस्ट्रेलियानं याची घोषणा केली. अँड्र्यू मॅकडोनाल्ड हे 2027 च्या अखेरीपर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षक राहतील, असं बोर्डानं म्हटलं आहे.
मॅकडोनाल्ड 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. त्यानंतर संघानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, एकदिवसीय विश्वचषक आणि त्याआधी ॲशेस मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियाची टीम सध्या कसोटीमध्ये नंबर वन तर टी20 आणि वनडेमध्ये नंबर दोनवर आहे. मॅकडोनाल्ड आता पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलसाठी संघाचं मार्गदर्शन करतील. त्यांच्यावर 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद कायम राखण्याची जबाबदारी असेल. तसेच त्यांच्या रडारवर पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 आयसीसी टी20 विश्वचषक असणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकली यांनी अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्या कार्यकाळ मुदतवाढीबद्दल सांगितलं की, “अँड्र्यू यांनी स्वतःला मुख्य प्रशिक्षक म्हणून सिद्ध केलं आहे. त्यांनी संघाला उत्कृष्ट निकाल दिले. त्यांनी टीममध्ये चांगलं वातावरण निर्माण केलं आहे. आम्हाला त्यांचा कार्यकाळ आणखी दोन वर्षांसाठी वाढवताना आनंद होत आहे.”
मॅकडोनाल्ड यांच्यासह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याचा कार्यकाळ देखील वाढवण्यात आलाय. कमिन्स आणि मॅकडोनाल्ड यांच्यातला समन्वय खूप चांगला आहे. आता हे दोघं 2027 विश्वचषकापर्यंत ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करतील. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखील ऑस्ट्रेलिया 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकली. यानंतर संघानं 2023 एकदिवसीय विश्वचषकावर देखील कब्जा केला. आता त्याचं पुढील लक्ष्य 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी आहे.
हेही वाचा –
गुजरात टायटन्सनं शमीला रिटेन केलं नाही? शुबमन गिलसह हे दोन खेळाडू संघात कायम!
चेन्नई सुपर किंग्जनं जाहीर केली रिटेन होणाऱ्या खेळाडूंची यादी! या 5 जणांना ठेवणार कायम?
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये विचारला 6 लाख रुपयांचा क्रिकेटचा प्रश्न! तुम्हाला उत्तर माहित आहे का?