Alyssa Healy Photographer: भारतीय महिला संघाने रविवारी (दि. 24 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटीत 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा कसोटीत पराभूत करण्यात यशस्वी झाला. विशेष म्हणजे, हा सामना संपल्यानंतर मैदानावर एक मन जिंकणारा नजारा पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची दिग्गज कर्णधार एलिसा हिली हिने भारतीय संघाचा हा ऐतिहासिक विजय स्वत: कॅमेरा हातात घेऊन कैद करताना दिसली. यादरम्यानचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
खरं तर, भारतीय महिला संघाने विजय मिळवल्यानंतर एलिसा हिली (Alyssa Healy) भारतीय महिला संघाचा फोटो काढताना दिसली. यावेळी भारतीय महिला संघाच्या खेळाडू ट्रॉफीसोबत जल्लोष साजरा करताना दिसल्या. आपल्या कर्णधाराने भारतीय संघाचा फोटो काढतानाचा व्हिडिओ ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरूनही शेअर करण्यात आला आहे.
Alyssa Healy, what a woman 🫶#INDvAUS pic.twitter.com/x4ZzAYjRU8
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) December 24, 2023
भारतीय महिला संघाला ट्रॉफीसोबत जल्लोष करताना पाहून एलिसा हिली स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिने कॅमेरा हातात घेत फोटो काढला. तिचा फोटो काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
सामन्याचा आढावा
या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने बॅट आणि गोलंदाजीतून शानदार प्रदर्शन केले. भारतीय गोलंदाजांनी सकाळी 28 धावा खर्चून ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेट्स घेतल्या. यामुळे पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाचा दुसरा डाव 261 धावांवर संपुष्टात आला. यासह भारतीय संघाला विजयासाठी 75 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान भारताने 18.4 षटकात 2 विकेट्स गमावत 75 धावा करून पार केले. यावेळी भारताकडून सलामी फलंदाज स्मृती मंधाना 38 धावा करून नाबाद राहिली. जेमिमा रॉड्रिग्ज हिनेदेखील नाबाद 12 धावा केल्या.
भारतीय महिला संघाने घडवला इतिहास
भारतीय महिला संघ 1995नंतर पहिल्यांदा कोणत्याही हंगामात मायदेशात एकापेक्षा जास्त कसोटी सामना खेळत होता. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पूर्ण सामन्यादरम्यान भारतीय संघ दबदबा कायम राखण्यात यशस्वी झाला. हा सामना जिंकत भारताने इतिहास घडवला आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा कसोटी सामन्यात पराभवाचा धक्का दिला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 11 कसोटी सामन्यातील भारताचा हा पहिला वहिला विजय ठरला.
इंग्लंडलाही दिलेला धोबीपछाड
यापूर्वी भारतीय महिला (India Women) संघाने डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीत इंग्लंड महिला संघालाही एकमेव कसोटीत 347 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले होते. हा कसोटी क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत इंग्लंडविरुद्ध कोणत्याही संघाचा सर्वात मोठा विजय होता. (australia skipper alyssa healy click photo of india womens team during winning celebration see photo)
हेही वाचा-
‘कोहलीला कसोटीमध्ये आऊट करायचा फॉर्म्युला सापडला, तुम्ही फक्त…’, दिग्गज क्रिकेटरने दिली आयडिया
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवताच हरमनचे सर्वात मोठे विधान; म्हणाली, ‘कठोर मेहनत आणि संयमाचे…’