मेलबर्न। भारतीय संघ यावर्षीच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगच दहाव्या मोसमही खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी (१५ जुलै) देशातील या प्रमुख टी२० लीगच्या ६१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
या वेळापत्रकानुसार ३ डिसेंबरला ऍडलेड ओव्हलमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्समध्ये खेळण्यात येणाऱ्या सामन्यापासून बीबीएलची सुरुवात होणार आहे. याच दिवसापासून ब्रिस्बेन येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. याव्यतिरिक्त १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान महिला बीबीएलचे ५९ सामने खेळण्यात येतील.
८ सामन्यांनंतर बीबीएलमध्ये विश्रांती घेतली जाईल
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या वेबसाईटवर म्हटले, “कोविड-१९ मुळे उन्हाळ्यात क्रिकेटच्या वेळापत्रकात बदल करणे भाग पडू शकते. परंतु आजच्या घोषणेमध्ये ६१ सामन्यांच्या वेळापत्रकाची पुष्टी करण्यात येत आहे.”
वेळापत्रकानुसार बीबीएलमध्ये सुरुवातीच्या ८ सामन्यांच्या आयोजनानंतर ५ दिवसांची विश्रांती घेतली जाणार आहे. कारण यादरम्यान ११ ते १५ डिसेंबरदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ऍडलेड ओव्हलमध्ये दिवस- रात्र कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना २६ ते ३० डिसेंबरदरम्यान खेळला जाणार आहे, तर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना पुढील वर्षी ३ ते ७ जानेवारी दरम्यान खेळण्यात येणार आहे.
कोविड-१९ वर ठेवण्यात येईल लक्ष
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगचे (Big Bash League) प्रमुख ऍलिस्टेयर डॉबसन (Alistair Dobson) यांनी म्हटले, कोविड-१९ वर सातत्याने लक्ष ठेवण्यात येईल. ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत या व्हायरसची ९ हजार प्रकरणे समोर आली आहेत.
“आपल्याला कोविड-१९ (Covid-19) च्या परिस्थितीवर लक्ष ठेवावे लागेल. सुरक्षित आणि यशस्वी स्पर्धेसाठी आम्ही संबंधित सरकारी संस्था, जैव-सुरक्षित वातावरणातील तज्ञ, सामन्यांची ठिकाणे, क्लब, खेळाडू, ब्रॉडकास्टर आणि आमच्या स्वत: च्या खाजगी कार्यसंघांसह एकत्र काम करू,” असेही त्यांनी पुढे म्हटले.