आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये ऑस्ट्रेलिया त्यांचा पहिला सामना खेळायचाच आहे, मात्र संघाला आधीच मोठा धक्का बसला आहे. संघातील एक प्रमुख खेळाडू पहिल्या सामन्यात खेळणार नाही. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया पहिला सामना ११ फेब्रुवारीला आयर्लंडविरुद्ध आहे.
आयर्लंडिरुद्धच्या सामन्यातून टिम डेविड बाहेर झाला आहे. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, यामुळे तो पाकिस्ताविरुद्धच्या टी२० मालिकेतही खेळला नव्हता. तो आता या दुखापतीतून सावरला असून पूर्णपणे तंदुरुस्तही आहे. त्याला अधिक आराम मिळावा, यासाठी त्याला आयर्लंडविरुद्धच्या अंतिम अकरामध्ये न घेण्याचे ठरवले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्श याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याबाबत स्पष्ट केले आहे.
डेविड बिग बॅश लीगमध्ये खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. या लीगमध्ये तो होबार्ट हरिकेन्सकडून खेळत होता. जेव्हापासून तो श्रीलंकेत संघाशी जोडला गेला तेव्हापासून त्याने टी२० विश्वचषकासाठी जोरदार तयारी सुरू केली.
ऑस्ट्रेलियासाठी टी२० विश्वचषकाचा हा हंगाम सुरूवातीपासूनच काहीसा निराशाजनक ठरत आला आहे. संघाला आधीच दोन मोठे धक्के बसले आहेत. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड आधीच दुखापतीतून सावरले नसल्याने स्पर्धेबाहेर झाले आहेत. दोन मोठे वेगवान गोलंदाज संघात नसल्याचे नुकसान ऑस्ट्रेलियाला होऊ शकते. आता पहिल्या सामन्यातून डेविडही बाहेर झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या पत्रकार परिषदेत मार्शने एक चांगली बातमीही दिली. त्याने नॅशन एलिस खेळण्यास फिट असल्याचेही सांगितले आहे. २०११नंतर प्रथमच ऑस्ट्रेलिया मिशेल स्टार्क, कमिन्स आणि हेझलवूड शिवाय खेळणार आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी आता एलिसवर असणार आहे.
तसेच मार्शने या परिषदेत आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठीची अंतिम अकरा खेळाडू सांगितले नाही, मात्र डेविडच्या अनुपस्थितीत मॅथ्यू रेनशॉला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याने बीबीएलमध्ये ब्रिसबेन हीटसाठी उत्तम फलंदाजी केली होती.
डेविडने आंतरराष्ट्रीय टी२०च्या ५८ डावांमध्ये ३६.२च्या सरासरीने १५९६ धावा केल्या आहेत. त्याने एक शतकही केले आहे. त्याच्या नसण्याने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला काही कमी जाणवेल की नाही, हे सामन्यातच स्पष्ट होईल.






